

धुळे : धुळे जिल्ह्यात विशेषता पांझरा नदीच्या उगम क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा प्रकल्पातून 45 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पांझरा नदीला पूर आला असून धुळे शहरातील तीन पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी महात्मा गांधी पुतळ्याजवळील मोठ्या पुलावरून रहदारी वळवण्यात आली आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पुरामुळे देवपुरातील शिक्षण संस्था देखील प्रभावित झाल्या आहेत.
धुळे जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यापूर्वी महिनाभर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र या आठवडाभरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून साक्री तालुक्यात पांझरा नदीचे उगम क्षेत्र तसेच पांझरा नदीच्या लगत असणाऱ्या सर्वच गावांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अक्कलपाडा प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. परिणामी आज सकाळी 45000 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नदीकाठच्या गावामधून देखील पाणी आल्याने सुमारे 50 हजार क्युसेक पेक्षा जास्त पाणी पाझरा नदीत आल्यामुळे नदीला मोठा पूर आला. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने कालिकामाता मंदिराजवळील फरशी पूल तसेच गणपती मंदिराजवळील आणि वीर सावरकर पुतळ्याजवळील पूल देखील रहदारीसाठी बंद केला. काल रात्रीपासूनच फरशी फुल पाण्यावर खाली गेला होता. मात्र आज सायंकाळी उर्वरित दोघेही पुलावरून पाणी गेले.
दरम्यान या पुलांवरील रहदारी थांबवल्यामुळे वाहतूक महात्मा गांधी पुतळ्याजवळील मोठ्या पुलावरून वळवण्यात आली. त्यामुळे या पुलावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. विशेषतः पुरामुळे देवपूर परिसरामधील शैक्षणिक संस्था प्रभावित झाल्या. या संस्थांना शिक्षण विभागाने खबरदारीचा सूचना दिल्या. यानंतर दुपारी सायकलीवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हाट्सअप ग्रुप वरून माहिती देण्यात आली. मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांना ही माहिती न मिळाल्याने त्यांना वाहतूक कोंडी सहन करून शाळेत जावे लागले. त्यातच काही वर्गांच्या परीक्षा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी धोका पत्करून शाळेत जाणे पसंत केले. मात्र शाळेत गेल्यानंतर ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा घरी परत यावे लागले. संबंधित शाळेच्या या ढिसाळ नियोजनामुळे पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला.
दरम्यान पांझरा नदीला 2019 नंतर तीनही पूल पाण्याखाली जातील, एवढा पूर आला. ही माहिती शहरात सोशल मीडियावरून पसरल्यानंतर पूर पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली. अनेकांनी तर धोकेदायक स्थितीमध्ये उभे राहून सेल्फी घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे पुरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी झटणारे अग्निशमन दल, पोलीस प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकाचे कर्मचारी यांची मात्र धावपळ सुरू झाली. पोलीस प्रशासनाने गर्दीला अडवण्यासाठी लांबवर बॅरिकेटिंग लावले होते. मात्र पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या काळजीच्या भूमिकेला धुळेकर गर्दीने हरताळ फासून सेल्फी घेण्याचा आपला मोह काही टाळला नाही.