

धुळे - धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी प्रकाशा-बुराई उपसा जलसिंचन योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्याचे काम १९९९ पासून सुरू असूनही अपेक्षित गतीने पूर्ण होत नाही. याबद्दल पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ही बाब गांभीर्याने निदर्शनास आणून दिली. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील हे ही सकारात्मक आहेत. त्यामुळे या योजनेचा केंद्र सरकारच्या निधीच्या संबंधित यादीत समावेश होण्यासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही अधिकाऱ्यांनी तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी मंत्री जयकुमार रावल केली.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्पांना गती देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला आ. चंद्रकांत रघुवंशी, आ. आमश्या पाडवी, आ. राम भदाणे, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राजेश मोरे, अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत प्रकाशा-बुराई उपसा जलसिंचन योजनेच्या संथ गतीने होणाऱ्या कामाचा प्रश्न प्राधान्याने उपस्थित करण्यात आला. तसेच सुलवाडे-जामफळ उपसा जलसिंचन योजनेची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
प्रकाशा-बुराई योजनेला केंद्राच्या निधीसाठी प्रयत्न
मंत्री जयकुमार रावल म्हणाले, प्रकाशा-बुराई उपसा जलसिंचन योजना धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील दुष्काळी भागासाठी महत्त्वपूर्ण आहे. या योजनेमुळे शिंदखेडा, नंदुरबार आणि साक्री तालुक्यांतील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तापी नदीतून वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रभावी वापर करून दुष्काळी भागातील शेतीला शाश्वत सिंचन उपलब्ध करून देण्याची क्षमता या योजनेत आहे.
मात्र, १९९९ पासून काम सुरू असलेल्या या प्रकल्पाची प्रगती अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने रावल यांनी संबंधित ठेकेदार व यंत्रणेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे प्रकल्पाच्या पूर्ततेला विलंब होत असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. कामाचा वेग वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि योजनेच्या अंमलबजावणीतील अडथळे तातडीने दूर करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
या योजनेसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळविण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्यात आला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली आहे. त्यामुळे योजनेचा केंद्र सरकारच्या निधीविषयक योजनेत किंवा संबंधित प्राधान्यक्रमाच्या यादीत समावेश होण्यासाठी आवश्यक निकष, तांत्रिक बाबी आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांनी विलंब न करता कार्यवाही करावी, असे जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले.
जामफळ धरणात १५ डिसेंबरपर्यंत पाणी पोहोचविण्याचे नियोजन करा
सुलवाडे-जामफळ उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत उर्वरित सुमारे ३०० मीटर मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम आणि १३३ केव्ही विद्युत पुरवठ्याचे काम तातडीने पूर्ण करून जामफळ धरणात १५ डिसेंबरपर्यंत पाणी पोहोचविण्याचे नियोजन करा, अशा सूचना मंत्री रावल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यामुळे धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळेल, असे मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी सांगितले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही प्राधान्याने करावी आणि कामांच्या प्रगतीवर नियमित लक्ष ठेवावे, असे निर्देश दिले.
अक्कलपाडातून हामडा नाल्यात पाणी सोडण्याची मागणी
साक्री तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अक्कलपाडा प्रकल्पातून हामडा नाल्यात पाणी सोडण्याची मागणीही मंत्री जयकुमार रावल यांनी बैठकीत मांडली. फोफरे, घाणेगाव यांसह माळमाथा परिसरातील १३ ते १४ दुष्काळी गावांना याचा लाभ होऊ शकतो. त्यामुळे हामडा नाल्यात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.