

धुळे : पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याच्या तपासात जप्त केलेला मुद्देमालच गायब केल्याचा प्रकार चौकशीत निष्पन्न झाल्याने दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीत निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोघा कर्मचाऱ्यांच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.
साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी गुन्ह्यामध्ये जप्त केलेला मुद्देमालच गायब केल्याची तक्रार झाली होती. पोहेकॉ महेंद्र अमरसिंग जाधव (सध्या नेमणूक पोलीस मुख्यालय) व निजामपूर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ शरद तुकाराम ठाकरे या दोघा कर्मचाऱ्यांनी हा अपहार केला आहे. सन २०१६ ते ५ मार्च २०२१ तसेच ९ जून २०२२ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत हा अपहार करण्यात आला.
नरडाणा पोलिसांनी विविध गुन्ह्यांचा तपास करताना लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पोलीस ठाण्यात जमा केलेला होता. निजामपूर पोलीस ठाण्यात मुद्देमाल कारकुन म्हणून पोहेकॉ नागेश्वर दशरथ सोनवणे हे रुजू झाले. त्यांनी येथील चार्ज घेतला त्यावेळी त्यांच्याकडे संपुर्ण मुद्देमाल सुपूर्द करणे आवश्यक होते. परंतु, पोहेकॉ शरद ठाकरे यांनी २२३ गुन्ह्यांतील मुद्देमालापैकी केवळ ४२ गुन्ह्यातील मुद्देमाल दिला. तर पोहेकॉ महेंद्र जाधव यांनी २९४ गुन्ह्यातील मुद्देमालापैकी केवळ २९ गुन्ह्यातील मुद्देमाल दिला. पोहेकॉ ठाकरे यांनी १५ लाख ५७ हजार ६० रुपये किमतीच्या मुद्देमालाचा तर पोहेकॉ जाधव यांनी १५ लाख ३४ हजार ३५० रुपयांच्या मुद्देमालाचा अपहार केल्याचे निदर्शनास आले .
त्यामुळे पोलीस ठाण्याच्या वतीने वरिष्ठ स्तरावर ही बाब कळवण्यात आली. यानंतर अपहार करणाऱ्या या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना मुद्देमाल जमा करण्याबाबत संधी देण्यात आली. तर चौकशीत देखील या दोघा कर्मचाऱ्यांनी हा गंभीर प्रकार केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोहेकॉ जाधव व ठाकरे यांचे तडकाफडकी निलंबन केले. शिवाय मुद्देमाल कारकुन नागेश्वर सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुध्द अपहाराचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.
या दोघा कर्मचाऱ्यांवर गंभीर स्वरुपाची कलमे लावण्यात आलेली आहेत. यात भारतीय न्याय संहितेचे कलम ३१४ म्हणजे 'अपचारी अपहार', ज्यामध्ये एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या चल मालमत्तेची प्राप्ती करून ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरणे. कलम ३१६ हे गुन्हेगारी विश्वासभंगाशी संबंधित आहे. या गुन्ह्यासाठी सात वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. कलम ३१६ (५) नुसार, सार्वजनिक सेवक (नोकरदार), बँकर, व्यापारी, दलाल, वकील किंवा एजंट म्हणून व्यवसाय करताना मालमत्तेचा विश्वासभंग केल्यास कठोर दंड होऊ शकतो. हे कलम मालमत्तेवरील विश्वासघात या गुन्ह्याशी संबंधित आहे. यात शिक्षा १० वर्ष होऊ शकते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धिवरे यांनी दिली.