

Ganja Seized in Dhule
धुळे : धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे. पवन नगर परिसरात छापा टाकत पोलिसांनी सुमारे 570 किलो गांजा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत एक कोटी 42 लाख रुपये आहे. या प्रकरणात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य तस्कराचा शोध सुरू आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पवन नगर येथील विश्वजित ज्ञानेश्वर चौगुले याने आपल्या घरात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा करून ठेवला असल्याचे समोर आले. ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना कळवून पोलिसांच्या दोन पथकांनी छाप्याचे नियोजन केले.
छापा टाकल्यानंतर चौगुले यांच्या घरातून खाकी रंगाच्या चिकटपट्टीने गुंडाळलेल्या पाकिटांमध्ये सुमारे 440.76 किलो गांजा आढळून आला. या साठ्याची किंमत सुमारे एक कोटी 10 लाख 19 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, चौकशीत आरोपीने मोहाडी येथील त्याच्या आजीच्या घरातही गांजा साठवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथेही छापा टाकला असता आणखी 129.85 किलो गांजा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत सुमारे 32 लाख 46 हजार 250 रुपये आहे.
या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.