धुळे : बदलापूर मध्ये शाळेत चिमूरड्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर आता धुळ्यात पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शाळांमध्ये पथकांच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली असून शाळा प्रशासनाला देखील सीसीटीव्ही कॅमेरे अद्यावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात कसूर करणाऱ्यांवर प्रसंगी कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.
बदलापूर (ठाणे) येथील एका नामांकीत शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैगिंक अत्याचाराची निंदनीय घटना घडलेली आहे. त्यामुळे पालकवर्गात अस्वस्थता पसरलेली दिसते. या घटनेमुळे राज्यात निषेध आंदोलने केली जात आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता, धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारींना विद्यार्थीनी व पालक हितासाठी शालेय भेटी आणि उपाय योजनांची तपासणी व मार्गदर्शनपर सुचनेची मोहिम राबवणे सुरू केले आहे.
बदलापूरच्या घटनेनंतर धुळे पोलीसांतर्फे धुळे जिल्हयातील विविध शाळांना अचानक भेटी देण्यात आल्या. मुख्याध्यापकांसह संयुक्त बैठक घेवुन भविष्यात धुळे जिल्हयात अशा काही अनुचित घटना घडु नये, याकरिता काही उपाय योजना धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाने सुचविण्यात आल्या आहेत. सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी, शहर वाहतुक नियंत्रण शाखा , दामिनी पथक यांना विविध शाळांना अचानक भेटी देवुन तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यास सांगीतले. त्यात मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांना सुचना देण्यात सुचित आल्या.
शाळा परिसरात सी.सी.टी.टी. कॅमेरे बसविण्यात यावेत. ते बसविलेले असतील तर सुस्थितीत व सुस्पष्ट चित्रण होत आहे किंवा नाही, ते काळजीपुर्वक तपासावे, शाळातील कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, मदतनीस, रिक्षा व बस चालक यांचे चारित्र्य पडताळणी करावी, शाळेच्या दर्शनी भागावर मुला-मुलींसाठी तक्रार पेटी ठेवावी, चांगला किंवा वाईट स्पर्श (गुड टच व बँड टच) बाबत मुलींना जागरुक करण्यासाठी महिला शिक्षिकांकडुन प्रात्याक्षिक करुन चांगला किंवा वाईट स्पर्शाचा फरक समजावुन सांगण्यात यावा, शाळेत लहान सहान घटना घडल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधण्याबाबत मुख्याध्यापकांना सांगण्यात आले. जेणेकरुन कोणताही अनुचित प्रकार घडु नये याची काळजी घेणे व त्यामुळे भविष्यातील अप्रिय घटना टाळण्यास हातभार लागु शकेल. तसेच शाळेच्या वेळेत छेडछाड विरोधी पथक तैनात ठेवण्यात येत आहे. पालकांनी देखील जागरुक राहुन आपल्या पाल्यांना विश्वासात घेवून त्यांचेशी चर्चा केली पाहिजे. पोलीसांकडुन लैंगिक अत्याचार करणारे विकृतांवर पोलीसांकडुन कठोर कायदेशिर कारवाई करण्यात येईल. असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.