

धुळे : पुढारी वृत्तसेवा- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत, मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा अभियान राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात आले. या अभियानाचे मूल्यांकन जाहीर झाले असुन यात बोरकुंड येथील इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान संचलित मुक्तांगण विद्यालयाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. खाजगी शाळा या गटातून मुक्तांगण शैक्षणिक संकुल,बोरकुंड या शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल विद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यात मुक्तांगणला ११ लाखांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या भागातच गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे, या उद्देशाने २०१६ मध्ये मुक्तांगण शैक्षणिक संकुल या विद्यालयाचा प्रारंभ झाला. इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे व सचिव शालिनीताई भदाणे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या विद्यालयाचे अल्पावधीतच वटवृक्षात रुपांतर झाले आहे. या शाळेत नर्सरी ते बारावीपर्यंतच्या वर्गांमध्ये सुमारे ३२०० विद्यार्थी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. ऐवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरणारी, खान्देशातल्या ग्रामीण भागातील मुक्तांगण एकमेव संस्था आहे. बोरकुंड परिसरातील पंचवीस ते तीस खेड्यांतील शेतकरी शेतमजूर कुटूंबातील पाल्य अल्प फी मध्ये या स्वयं अर्थसहायीत शाळेत शिक्षण घेतात. त्यातही असंख्य विधवा, परीतक्त्या, आजी माजी सैनिकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण दिले जाते.
शाळेचा निसर्गरम्य परिसर, प्रशस्त क्रीडांगण, पर्यावरण पूरक वृक्षलागवड, अत्यंत मनमोहक शिक्षणाभिमुख इमारत, विविध गुणदर्शन, क्रीडा व स्पर्धा परीक्षेतील सुयश, स्थापनेपासून तर आजतागायत दहावी बारावी चे १०० टक्के निकाल, शिष्यवृत्ती परिक्षेतील उज्वल यश आदी बाबींचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. या मुक्तांगण विद्यालयाने विविध पातळीवर केलेल्या कामाची दखल घेत, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात
जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला
या शाळेला केंद्रस्तरिय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने प्रत्यक्ष भेटी देऊन विविध निकषानुसार तपासणी केली होती.
या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या तयारी दरम्यान संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रावण भदाणे, सचिव शालिनीताई भदाणे, गट शिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, विस्तार अधिकारी कोळी, विस्तार अधिकारी घुगे, केंद्रप्रमुख वानखेडे, केंद्रप्रमुख झाल्टे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या उपक्रमांत राज्यातील १ लाख ३ हजार ३१२ शाळा सहभागी झाल्या. या शाळांमधील १ कोटी ९६ लाख ६१ हजार ५८६ विद्यार्थी सहभागी झाले. या अभियानातंर्गत शाळांना ६६ कोटींवर बक्षिसे मिळणार आहेत.
सदर अभियानात यश प्राप्त करण्यासाठी टीम लिडर मंगलेश जोशी, नितीन राजपूत, जितेंद्र खरे, सौरभ वाघ, अमोल धातकर , अशोक शेवाळे , राकेश पाटील, अख्तर अन्सारी, अमीन अन्सारी, विजय पाटील, विलास परदेशी, सागर मोरे, बापू मोरे, सीमा मोरे , राधिका अहिरराव यांनी परिश्रम घेतले. मुक्तांगण शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा