

धुळे : धुळ्यातील तरुणीचे खोटे धर्मांतरण करून दुसरे लग्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला आता शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या प्रकरणात वेगवेगळ्या चौकशी करून गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी बडतर्फीची ही कारवाई केली आहे.
धुळे येथील आझाद नगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या शाकीब कलीम शेख याने 30 डिसेंबर 2024 रोजी एका हिंदू मुलीचे खोटे धर्मांतरण करून तिचे नाव माही शाकिब शेख असे ठेवल्याची बाब निदर्शनास आली. या दोघांनी एक जानेवारी 2025 रोजी मुस्लिम पद्धतीने विवाह केल्याची बाब उघडकीस आली. या विवाहाच्या वेळीस शाकीब याचे पहिले लग्न 5 नोव्हेंबर 2023 रोजी झालेले होते. त्यापासून त्याला एक अपत्य देखील होते.
या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. या संदर्भात तक्रार झाल्याने शेख याला 2 जानेवारी 2025 रोजी निलंबित करण्यात आले होते. या नंतर त्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी 6 जानेवारी 2025 रोजी प्राथमिक चौकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर केला त्यानुसार 14 जानेवारी रोजी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात शेख याच्यासह त्याचे वडील अलीम जाहिरोद्दीन शेख आणि आई शबाना कलीम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या आरोपींना 24 जानेवारी रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर पोलीस कर्मचारी शेख याची विभागीय चौकशी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी करून अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाला सादर केला. दरम्यान 2 जानेवारी रोजी शेख याला निलंबित करण्यात आले होते. आता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस कर्मचारी शेख याला आतापर्यंत झालेल्या चौकशी अहवालांच्या नुसार शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे. अतिशय संवेदनशील असणाऱ्या या प्रश्नावर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने हालचाली करीत चौकशी करण्यात आली. त्यानंतर ही कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे.