

धुळे : चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील वडिलोपार्जित शेतजमिनीवरील जुन्या कालबाह्य नोंदी ७/१२ उताऱ्यावरून कमी करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी सायंकाळी चाळीसगाव तहसील कार्यालयाबाहेर सापळा रचून महिला तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहिम, रोजगार सेवक वाडीलाल रोहिदास पवार आणि दादा बाबू जाधव यांना रंगेहात पकडले.
तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीवरील जुनी नजर गहाण नोंद कमी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी तलाठी मोमीन यांनी तक्रारदार यांना "तुमचे काम मोठे आहे, मी वाडीलाल पवार यांच्याशी बोलते, त्यांना भेटा," असे सांगितले. तक्रारदारांनी रोजगार सेवक वाडीलाल पवार यांची भेट घेतली असता, त्यांनी तलाठी मोमीन यांच्या सांगण्यानुसार २५ हजार रुपये लाच मागितली. "मोमीन मॅडम यांनी सांगितले आहे, पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही," असे वाडीलाल पवार यांनी स्पष्ट केले.
तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर, ३० रोजी सायंकाळी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून २५ हजार रुपये घेतल्यानंतर, रोजगार सेवक वाडीलाल पवार हे पैसे तलाठी मोमीन यांना देण्यासाठी जात असताना, एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणात तिघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे आणि त्यांच्या पथकाने केली. या यशस्वी कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचारावर मोठा आघात झाला आहे.