Dhule Temple Theft | धुळे-नाशिकमधील मंदिरचोरींचा पर्दाफाश; मध्यप्रदेशातील 2 सराईत जेरबंद, 4 किलो चांदीचे दागिने जप्त

धुळे शहरातील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिरातील चोरीचाही छडा
Dhule Nashik Temple Burglaries Solved
मध्यप्रदेशातील दोन सराईत चोरट्यांना शिरपूर शहर पोलिसांनी अटक केली. Pudhari
Published on
Updated on

Dhule Nashik Temple Burglaries Solved

धुळे : धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन सराईत चोरट्यांना शिरपूर शहर पोलिसांनी अटक करत तब्बल चार किलो १९९ ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ७ लाख ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे मंदिरचोरीचे चार आणि इतर दोन अशा एकूण सहा गुन्ह्यांची उकल झाली असून धुळे शहरातील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिरातील चोरीचाही छडा लागला आहे.

शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील दत्त मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे २२ ते २५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) व ३०५(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संवेदनशील गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी शोध पथकाला दिले.

Dhule Nashik Temple Burglaries Solved
Dhule news: इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा लाचखोर सहायक संचालक जाळ्यात

तपासादरम्यान पोलिसांनी विविध मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, गोपनीय माहितीदारांचे जाळे सक्रिय केले आणि आरोपींचा माग काढला. त्यानंतर मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यातील मोहाला येथील नवाडफल्या व नाहलाफल्या परिसरात छापा टाकून सदीम गिलदार देवका आणि भिकला रामसिंग देवका या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी सावळदेसह विविध मंदिरांमधील चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

चार मंदिरचोरींसह सहा गुन्ह्यांची उकल

पोलिस कोठडीत आरोपींनी शिरपूर शहरातील शहादा रोडवरील एका घरात, सावळदेजवळील झोपडीत, सावळदे दत्त मंदिर, धुळे येथील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिर, मालेगावजवळील रामदेव महाराज मंदिर आणि सटाणा येथील साईबाबा मंदिरातील चोरीची कबुली दिली. त्यांच्या कबुलीनंतर चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Dhule Nashik Temple Burglaries Solved
Heavy rainfall dhule : जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, शहरातील शाळांना सुट्टी

आरोपींकडून १९ हजार ३०० रुपयांची रोकड, १ हजार १३१ ग्रॅम वजनाचा चांदीचा घोडा, ८२० ग्रॅम वजनाचे ७८ चांदीचे घोडे, १ हजार २६९ ग्रॅम वजनाचे पाच चांदीचे मुकूट, ६०१ ग्रॅम वजनाच्या तीन चांदीच्या पाटल्या, तसेच ३५१ ग्रॅम वजनाचे चांदीचे कडे, जोडवे, ब्रेसलेट, साखळ्या, हार, छत्री आणि नाग अशी एकूण ४ किलो १९९ ग्रॅम चांदीची आभूषणे हस्तगत करण्यात आली.

जप्त मुद्देमालासह आरोपींना जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे उपस्थित होते. मंदिरचोरीसारख्या बहुचर्चित आणि संवेदनशील गुन्ह्यांचा छडा लावल्याबद्दल पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी शिरपूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news