

धुळे : नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेची बचत करणाऱ्या सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने धुळे महानगरपालिकेने विवाह नोंदणी सेवा पूर्णतः ऑनलाईन स्वरूपात सुरू केली आहे. या नव्या उपक्रमामुळे नागरिकांना विवाह नोंदणीसाठी महानगरपालिका कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नसून घरबसल्या ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.
महानगरपालिकेने विवाह नोंदणी प्रक्रियेतील अर्ज सादरीकरण, कागदपत्रांची पडताळणी, उपस्थितीबाबत सूचना तसेच प्रमाणपत्र वितरण या सर्व प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि कार्यक्षम केल्या आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी ही सेवा धुळे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर, धुळे ई कनेक्ट ॲपवर तसेच संकेतस्थळावरील चॅटबॉट सुविधेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, दि. ८ जून २०२६ पासून विवाह नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य राहणार असून ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
विवाह नोंदणीसाठी अर्जदारांनी प्रथम ऑनलाईन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर अर्ज व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अर्जदारांना प्रत्यक्ष उपस्थितीसाठी दिनांक व वेळ कळविण्यात येईल. निर्धारित दिवशी आवश्यक मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहिल्यानंतर सर्व माहिती योग्य आढळल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
विवाह नोंदणीसंदर्भात अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त किशोर वाघ किंवा सिस्टीम मॅनेजर बासित पठाण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. धुळे महानगरपालिका नागरिकांना अधिकाधिक डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून विवाह नोंदणी सेवा ऑनलाईन झाल्यामुळे नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचण्यास मोठी मदत होणार असल्याची प्रतिक्रिया आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे.