

धुळे : धुळे शहरालगत असणाऱ्या मोहाडी उपनगरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपीला तातडीने शोधून कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
मोहाडी उपनगरातील दंडेवाले बाबानगर परिसरात लिलाबाई हिरामण सूर्यवंशी (वय 70) या एकट्याच वास्तव्यास होत्या. त्या दररोज सकाळी लवकर भिक्षेसाठी बाहेर पडत असत. मात्र सोमवारी (दि.15) रोजी त्या सकाळपासून दिसून न आल्याने नागरिकांना संशय आला. त्यांच्या घराला बाहेरून कडी लावलेली असल्याचे लक्षात आल्यानंतर काही नागरिकांनी घरात डोकावून पाहिले असता लिलाबाई या रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
या घटनेची माहिती तातडीने मोहाडी पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. प्राथमिक पाहणीत हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली.
प्राथमिक तपासात लिलाबाई सूर्यवंशी यांच्या शरीरावर गंभीर जखमा असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवावा
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री जयकुमार रावळ, आमदार अनुप अग्रवाल, अल्पा अग्रवाल तसेच भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी प्रतिक्रिया देताना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. घटनास्थळी काही संशयित वस्तू आढळून आल्या असून त्या आरोपीच्या असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास वेगाने सुरू आहे.