

धुळे : पुढारी ऑनलाइन डेस्क - श्रमिक, शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढाऊ नेते, लाल बावट्याच्या मूल्यांशी एकनिष्ठ असणाऱ्या पक्षाचे राज्य अध्यक्ष तसेच सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड सुभाष काकुस्ते यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 75 व्या वर्षी साक्री येथे निधन झाले आहे. (Comrade Subhash Kakuste dies at 75 in Sakri)
कॉम्रेड सुभाष काकुस्ते किसान महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा श्रमिक शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. राज्य साखर कामगार महासंघाचे अध्यक्षपदही त्यांनी दीर्घकाळ सांभाळले होते. दिल्ली येथे केंद्रातील भाजप सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये 13 महिने चाललेल्या किसान आंदोलनात काकुस्ते यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते.
महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीचे तसेच जागतिकीकरण विरोधी चळवळीचे ते मार्गदर्शक होते. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे ते 2022 पर्यंत ते उपाध्यक्ष राहीले होते. अमळनेर येथे झालेल्या 17 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आदिवासी वन हक्काच्या प्रश्नावरही ते सत्यशोधक चळवळीचे खंबीर पाठीराखे होते. संविधानवादी व धर्मनिरपेक्ष समतावादी मूल्यांसाठी त्यांनी जीवनभर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला.
राज्य साखर कामगार महासंघाचे नेते म्हणून त्यांनी साखर सम्राटांच्या विरोधात देखील काकुस्ते यांनी आवाज उठवला. यामुळेच त्यांच्या घरावर दरोडाही टाकण्यात आला होता. संविधान निष्ठा आणि लाल बावट्याच्या मूल्यांशी एकनिष्ठ व्यवहार हे काकुस्ते यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य असल्याची भावना त्यांचे लाल बावट्याच्या चळवळीतील निकटचे सहकारी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉम्रेड किशोर ढमाले यांनी व्यक्त केली आहे.