Dhule Protest | धुळ्यात महापौर मायादेवी परदेशी यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा

भाजप कार्यकर्त्यांवरील खोट्या गुन्ह्यांविरोधात अधिवेशनात आवाज उठवणार : अनुप अग्रवाल
Mayadevi Pardeshi Social Media Post Controversy
नारी शक्तीच्या सन्मानासाठी धुळ्यात आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला Pudhari
Published on: 
Updated on: 

Mayadevi Pardeshi Social Media Post Controversy

धुळे : महापौर मायादेवी परदेशी यांच्याविषयी सोशल मीडियावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टचा निषेध करण्यासाठी तसेच नारी शक्तीच्या सन्मानासाठी धुळ्यात आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. भाजपच्या तरुण कार्यकर्त्यांवर पोलिसांनी दबावाखाली खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत, हा प्रश्न आगामी अधिवेशनात उपस्थित करणार असून प्रशासनाला त्याचे उत्तर द्यावे लागेल, असा इशारा आमदार अग्रवाल यांनी दिला.

धुळे शहरात सोशल मीडियावरील पोस्टवरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद उमटले आहेत. गोरक्षक संजय शर्मा यांनी महापौर मायादेवी परदेशी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याने संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर शर्मा यांच्या घरावर जमावाने हल्ला करून तोडफोड केली. या प्रकरणी आझादनगर पोलिसांनी संजय शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

Mayadevi Pardeshi Social Media Post Controversy
Dhule News |धुळ्यात सोशल मीडियावरील पोस्टमुळे वातावरण चिघळले! महापौरांच्या अपमान प्रकरणात गोरक्षक संजय शर्मा यांना अटक

या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. माजी केंद्रीय संरक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, डॉ. सुशील महाजन, माजी महापौर जयश्री अहिरराव, नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि महिलांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग घेतला. मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत नेण्यात आला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आमदार अग्रवाल यांनी भूमिका मांडली.

धुळे शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असून विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विकृत मानसिकतेच्या लोकांमुळे शहरातील वातावरण दूषित होत आहे. अशा परिस्थितीत उद्योजक शहरात गुंतवणूक करण्यास पुढे येणार नाहीत. त्यामुळे युवक आणि महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्यावरही परिणाम होऊ शकतो, असे अग्रवाल म्हणाले.

Mayadevi Pardeshi Social Media Post Controversy
Dhule News | रामीच्या मातीत वीरपुत्र जयेश माळी यांना अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार!

महापौर मायादेवी परदेशी सक्षमपणे काम करीत असताना त्यांचा अपमान करणाऱ्या पोस्टमुळे त्यांना मानसिक त्रास झाला. या घटनेनंतर त्यांनी विष प्राशन केले असून, रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.

संजय शर्मा यांनी पोलिसांच्या उपस्थितीत न्यायालयात हिंसक भाषा वापरल्याचा आरोपही त्यांनी केला. शर्मा कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आपल्यासह भाजप कार्यकर्त्यांची बदनामी करणारे आणि खोटे गुन्हे दाखल झाल्याचा दावा करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करूनच कारवाई करावी, अशी मागणी अग्रवाल यांनी केली. हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करून प्रशासनाला जाब विचारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.