Dhule News | रामीच्या मातीत वीरपुत्र जयेश माळी यांना अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार!

देशसेवेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरजवानाला साश्रुनयनांनी निरोप; शोकाकुल वातावरणात रामी गावाने दिली अखेरची मानवंदना
Dhule News | रामीच्या मातीत वीरपुत्र जयेश माळी यांना अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार!
Dhule News | रामीच्या मातीत वीरपुत्र जयेश माळी यांना अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार!
Published on: 
Updated on: 

धुळे : देशसेवेचे कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या धुळे तालुक्यातील रामी गावचे सुपुत्र, भारतीय सैन्यदलाचे जवान जयेश माळी यांना आज त्यांच्या जन्मभूमीत साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. अवघ्या 25 व्या वर्षी देशसेवेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या या वीरपुत्रावर शनिवारी रामी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप देताना संपूर्ण गाव शोकमग्न झाले होते. सैन्यदलाच्या वतीने वीरजवानाला मानवंदना अर्पण करण्यात आली.

मणिपूरमध्ये कर्तव्य बजावत असताना 18 नोव्हेंबर 2026 रोजी लष्करी वाहनाच्या अपघातात वीरमरण आलेल्या जयेश माळी यांचे पार्थिव आज त्यांच्या मूळगावी रामी येथे आणण्यात आले. देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या या तरुण जवानाचे पार्थिव गावात दाखल होताच वातावरण शोकाकुल झाले. आपल्या गावचा सुपुत्र आता पुन्हा कधीही परतणार नाही, या जाणिवेने उपस्थितांचे डोळे पाणावले. वीरजवानाच्या अंतिम दर्शनासाठी ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते.

भारतीय सैन्यदलातील 357 फील्ड हॉस्पिटलमध्ये शिपाई (नर्सिंग असिस्टंट) म्हणून कार्यरत असलेले जयेश माळी यांनी 2 वर्षे 6 महिने सैन्यसेवा बजावली होती. मणिपूरमधील उखरूल पूर्व भागातील चालाऊ येथे कर्तव्यावर असताना 18 नोव्हेंबर रोजी झालेल्या लष्करी वाहनाच्या अपघातात त्यांना वीरमरण आले. ऐन तारुण्यात देशसेवेची वाट निवडलेल्या जयेश यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मान्यवरांकडून वीर जवानाला श्रद्धांजली

वीरजवान जयेश माळी यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी महाराष्ट्र बटालियनचे कर्नल संजय कुमार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर डॉ. निलेश प्रकाश पाटील, आमदार राघवेंद्र भदाणे, माजी आमदार कुणाल पाटील, शरद पाटील, नवी मुंबई बाजार समितीचे संचालक रावसाहेब गिरासे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष देवरे, माजी अध्यक्षा धरती देवरे, तहसीलदार अरुण शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी तुषार देवरे, गटविकास अधिकारी नितीन खंडेराय, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण बोरसे, रामीचे माजी सरपंच दिलीप गिरासे यांच्यासह ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वीरजवान जयेश माळी यांच्या पार्थिवावार पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

एका वीरपुत्राच्या आठवणी गावाच्या मनात कायम

वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी देशसेवेच्या कर्तव्यावर असताना जयेश माळी यांची जीवनयात्रा थांबली. ज्या मातीत त्यांचे बालपण गेले, त्याच मातीत आज त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. कुटुंबीयांसाठी हा कधीही भरून न निघणारा आघात असला, तरी देशसेवेसाठी त्यांनी दिलेले योगदान रामी गावासाठी कायम अभिमानाचा विषय राहील. एका आई-वडिलांनी आपला तरुण मुलगा गमावला, तर रामी गावाने आपला कर्तव्यनिष्ठ वीरपुत्र गमावला. त्यांच्या स्मृती आणि देशसेवेप्रती असलेली निष्ठा सदैव स्मरणात राहील.

वीरजवान जयेश माळी यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही-पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे तालुक्यातील रामी गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यदलातील वीरजवान जयेश माळी यांना मणिपूर येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात वीरमरण आले. ही घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे. अवघ्या 25 वर्षांच्या वयात मातृभूमीच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान धुळे जिल्हा, महाराष्ट्र आणि संपूर्ण देश सदैव स्मरणात ठेवेल, अशा शब्दांत धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी ऑडिओ शोकसंदेशाद्वारे वीरजवान जयेश माळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.