

धुळे : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रातील अंतर्गत वादातून गर्भवती महिलेचा खून करून तिचा मृतदेह धुळे जिल्ह्यातील गरताड बारीजवळील डोंगराळ भागात जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पिंकी हनुमंत काटकर (वय ३१, रा. आदिवासीवाडी, मुखरबाचीवाडी, पो. चिंचवली तर्फे आतोणे, रायगड) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणात सहा आरोपी निष्पन्न झाले असून, त्यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. फरार असलेल्या दोघांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
धुळे-सोलापूर महामार्गावर गरताड बारीजवळील डोंगरावर एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृतदेहाजवळ ज्वलनशील पदार्थाची बाटलीही आढळली होती. शवविच्छेदन अहवालात सदर महिला गर्भवती असल्याचे तसेच तिला जाळून ठार केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी धुळे तसेच लगतच्या जिल्ह्यांमधील बेपत्ता महिलांची माहिती तपासण्यात आली. मात्र, कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मोहाडी पोलिस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील यांनी स्वतंत्र पथक तयार करून तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनीही समांतर तपासाला सुरुवात केली.
पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, निरीक्षक शिल्पा पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक शरद बागल यांनी महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तब्बल ११ तास फुटेज तपासले. या तपासात एक संशयित हुंडाई मोबिलिओ कार (एमएच-४३/एआर-४०७०) पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यानंतर वाहनाचा मार्ग आणि इतर तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करण्यात आले. हे वाहन अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथून आल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर मोहाडी पोलिसांचे पथक जामखेड येथील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रात पोहोचले. पोलिसांनी कारचालक सर्फराज उर्फ शफीक अलीम मोमीन (रा. गांधीनगर, विलाल मशिदीजवळ, कळंब), आरिफ उर्फ खुज्या आसिफ शेख (रा. इंदिरानगर, हावरगाव रोड, कळंब), कला केंद्रातील कलाकार स्वाती उर्फ आरती गणेश कुन्हाडे (रा. जामखेड) आणि लक्ष्मी बालाजी पवार (वय ३०, रा. बसस्थानक डेपोच्या मागे, कळंब) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत पिंकी काटकर हिचा खून केल्याची माहिती आरोपींकडून मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. कला केंद्रातील अंतर्गत वादातून पिंकी हिला बीड येथील मांजरसुंबा चौफुलीजवळील एका घरात सर्व आरोपींनी मारहाण केली. यात ती बेशुद्ध झाली. तिचा मृत्यू झाल्याचे समजून आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा कट रचला.
त्यानंतर पिंकीचा मृतदेह वाहनात टाकून आरोपी राजस्थानच्या दिशेने निघाले. मात्र, धुळे तालुक्यातील गरताड बारीजवळ नरव्हाळ शिवारातील मुरमाड टेकडी लगतच्या निर्जन वनक्षेत्रात त्यांनी वाहन थांबवले. तेथे पिंकीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून टाकल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यानंतर आरोपी मालेगाव-मनमाड मार्गे जामखेडच्या दिशेने निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात फारुख शेख (रा. कळंब) आणि रोहिणी जाधव (रा. केंब्रिज कॉलनी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर) यांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.