

Heatstroke deaths in Dhule
धुळे : धुळे जिल्ह्यात तापमानाचा कहर सुरू असून मंगळवारी (दि. २८) 45 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान तीव्र उन्हामुळे धुळे तालुक्यातील आर्णी गावातील पोल्ट्री फार्म मधील सुमारे 200 कोंबड्यांचा मृत्यू झाला असून दोघांचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला आहे. तीव्र उन्हामुळेच या घटना घडल्याचा दावा केला जातो आहे.
धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून तापमानाने कहर सुरू केला आहे. 42 अंशावरून तापमान वाढीचा सुरू झालेला हा प्रवास आज 45 अंशावर स्थिरावला आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान याचा फटका आता पक्षी आणि प्राणी यांना देखील होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
धुळे तालुक्यातील आर्णी भागात असणाऱ्या पोल्ट्री फार्म मध्ये कोंबड्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पोल्ट्री फार्म मध्ये सुमारे 200 कोंबड्या एकाच वेळी मृत झाल्या असून तीव्र उन्हामुळे या कोंबड्या मृत झाल्या असाव्यात असा दावा केला जातो आहे.
दरम्यान उष्णतेच्या तीव्रतेमुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. फागणे येथील रहिवासी बाबुलाल युवराज लोंढे (वय २९) सकाळी ९.३० वाजता घरी जात असताना चक्कर येवून खाली पडले. त्यांच्यावर हिरे रुग्णालयात उपचार सुरु असताना सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
तर दुसऱ्या घटनेत वाहनचालक रावसाहेब प्रकाश लिंगायत रा. सुरत हे काल अवधान फाट्याजवळ बेशुध्दावस्थेत पडलेले आढळून आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या दोन्ही घटना तीव्र उष्णतेमुळे घडल्याचे सांगितले जाते आहे.