

Gurudwara leadership dispute Dhule
धुळे : गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला धुळे येथील गुरुद्वारामध्ये प्रमुखपदाच्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या घटनेदरम्यान दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली, तसेच धारदार शस्त्रांचा धाक दाखवण्यात आला. या घटनेची पार्श्वभूमी गुरुद्वाराचे माजी प्रमुख दिवंगत बाबा धीरज सिंह यांच्या हत्येशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
धुळे येथील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंहजी यांच्यावर काही काळापूर्वी गुरुद्वारामध्ये तात्पुरत्या स्वरूपात सेवा करणाऱ्या एका माथेफिरू तरुणाने तलवारीने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर गुरुद्वाराच्या प्रमुखपदावरून वाद निर्माण झाला.
दिवंगत बाबा धीरज सिंहजी यांचे भाऊ बाबा दारासिंहजी यांना एका गटाने प्रमुख घोषित केले, तर दुसऱ्या गटाने बाबा धीरज सिंहजी यांचे भाचे रणवीर सिंह खालसा यांना प्रमुख म्हणून मान्यता दिली. गुरुद्वाराच्या व्यवस्थापनासाठी समिती स्थापन करण्यात आली असली तरीही वाद निवळण्याऐवजी अधिकच चिघळत गेला.
दरम्यान, गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला एका गटाने गुरुद्वाराचे प्रवेशद्वार बंद केल्याचा आरोप करण्यात आला. याच कारणावरून दोन्ही गट आमनेसामने आले आणि वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. दगडफेक व शस्त्रांचा धाक दाखवण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील, मोहाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुरुद्वाराशी संबंधित नसलेल्या जमावाला बाहेर काढत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात रणवीर सिंह खालसा यांच्यासह दर्शनसिंग सुखदेवसिंग खालसा, जगबिंदरसिंग हरप्रीतसिंग संद, दलेरसिंग मिरसिंग (रा. अमृतसर), लालसिंग सिंगारामसिंग (रा. अमृतसर), सुदेशसिंग बचनलाल उर्फ बच्चनसिंग (रा. गुरुदासपूर), दारासिंग मखनसिंग (रा. अमृतसर), कर्तारसिंग जागरसिंग सिख (रा. शिवपुरी, मध्यप्रदेश), शविंदरसिंग रजवंतसिंग (रा. अमृतसर), गुरप्रीतसिंग बसंतसिंग (रा. गुरुद्वारा, धुळे), संदीपसिंग भवरलाल (रा. राजस्थान), गुरिंदरसिंग लखबिरसिंग (रा. फत्तेगड, पंजाब) यांच्यासह १० ते १५ जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२६(२), ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली असून पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत.