Dhule | चितोड गावातील चौघा मयतांच्या आदिवासी वस्तीत आता स्मशान शांतता

Dhule Ganesh Visarjan Accident | गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी ट्रॅक्टर गर्दीत शिरल्याने अपघात
Dhule Ganesh Visarjan Accident
माय लेकांसह चौघांचा गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर खाली येऊन मृत्यू झाला. file photo
Published on
Updated on
धुळे : यशवंत हरणे

कष्टकरी समाज म्हणून ओळख असणाऱ्या चितोड गावातील आदिवासी वस्तीमध्ये आता स्मशान शांतता पसरली आहे. या वस्तीमधील माय लेकांसह चौघांचा गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर खाली येऊन मृत्यू झाला. गेल्या दहा दिवस आदिवासी वस्तीमध्ये गणरायाची आरती आणि मिरवणुकीचा उत्साह होता. पण आता या ठिकाणी कुणीही कुणाशी बोलण्यास तयार नाही, असे वातावरण आहे. या अपघातात मृत झालेल्या चौघांची एकाच वेळी अंत्ययात्रा निघाली. हा प्रसंग गावात पहिल्यांदाच घडला. त्यामुळे गाव देखील हादरला आहे. (Ganesh Visarjan deaths Dhule)

नेमकं काय घडलं ? Dhule Ganesh Visarjan Accident

धुळे शहरालगत असणाऱ्या चितोड गावात आदिवासी वस्ती मधील तरुण दरवर्षी एकलव्य मित्र मंडळाच्या माध्यमातून श्री गणरायाची स्थापना करतात. यावर्षी देखील या मंडळाने आकर्षक मूर्ती स्थापन केली. या वसाहतीमध्ये अंग मेहनतीची मजुरी करणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठून कामावर जाणे. आणि सायंकाळी उशिरा घरी परत येणे, असा त्यांचा दिनक्रम आहे. मात्र गणेश उत्सवाच्या काळामध्ये सर्व वस्ती गणरायाच्या मूर्ती समोर गोळा होते. यानंतर आरतीचा उत्साह सुरू होतो. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी महिला आणि बालकांचा मनोरंजनाचा कार्यक्रम देखील होतो. या दहा दिवसांमध्ये कष्टाचे जीवन जगणाऱ्या या समाजामध्ये आनंद आणि उत्साहाचा उत्सवच असतो. यावर्षी देखील दहा दिवस असाच उत्सव सुरू होता. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सजवलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये गणरायाची मूर्ती ठेवण्यात आली. यानंतर ही मिरवणूक गावातून नेण्यात आली. मिरवणूक हळूहळू विसर्जन स्थळाकडे जात होती. यावेळी डीजेच्या तालावर तरुण नृत्य करत होते. तर आबाल वृद्ध आपल्या डोळ्यांमध्ये हा आनंदाचा सोहळा साठवत होते. पण अचानक ट्रॅक्टर गर्दीत शिरले. यानंतर शेरा बापू सोनवणे (वय 6), परी उर्फ देवयानी शांताराम बागुल (वय १३), आदित्य उर्फ लाडू दीपक पवार (वय 3 ) हे बालक ट्रॅक्टरच्या खाली दाबले गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गायत्री दिपक पवार, रिया दुर्गेश सोनवणे, ताया चंदू मालचे, अजय रमेश सूर्यवंशी, विद्या भगवान जाधव, ललिता पिंटू मोरे, कल्पना शशी सूर्यवंशी यांच्यासह अन्य चार जण हे जखमी झाले.

एकाचवेळी चौघांची अंत्ययात्रा निघाल्याने गावावर शोककळा

अपघात होताच घटनास्थळी आनंदा वर विरजण पडून एकच हाहाकार उडाला. ट्रॅक्टर खालून चिमूरड्यांचे निपचित झालेले देह बाहेर काढत असताना त्यांच्या नातेवाईकांनी चित्कार फोडला. यावेळी तरुणांनी मयत आणि जखमींना तातडीने रुग्णालयात रवाना केले. शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात अचानक चमत्कार होऊन आपले चिल्ले- पिल्ले जिवंत राहतील, अशी भाबडी अपेक्षा घेऊन या कष्टकरी समाजाने आपली प्रार्थना सुरू ठेवली. मात्र काळाने आपला डाव साधून तिघा बालकांना आपल्या कुशीत घेतले होते. त्यांचे शवविच्छेदन सुरू असतानाच अचानक पुन्हा या समाजाला धक्का बसला. आणि गायत्री दीपक पवार या महिलेचा देखील उपचार घेत असताना मृत्यू झाला. त्यामुळे एकाच वेळी चौघा मृतांचे शवविच्छेदन करून चितोड गावातील आदिवासी वस्तीत रात्री उशिरा मृतदेह आणले गेले. चौघा मृतांमध्ये गायत्री पवार आणि आदित्य पवार हे मायलेक तर उर्वरित तिघे एकमेकांचे जवळचे नातेवाईकच होते. त्यामुळे चौघांची अंत्ययात्रा रात्री उशिरा एकाच वेळी सुरू झाली. चितोड गावातील प्रत्येक घरातील नागरिक या अंत्ययात्रेत सहभागी झाले. रीती रीवाजाप्रमाणे अंत्यविधी पार पडला. मात्र आज सकाळपासून या गावावर शोक कळा पसरली आहे. या वस्त्यांमध्ये शांतता दिसते. तर कुणाशीही या संबंधात बोलण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना बोलण्यासाठी शब्द सुचत नाही. मिरवणुकीत उपस्थित असणाऱ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि डोळ्यातील दुःख हे शब्दात सांगण्याजोगे नाही. मयतांच्या घरी तर विलाप करून आता त्यांच्या नातेवाईकांचे अश्रू देखील आटले आहे. त्यांच्या घरातही निरव शांतता आहे. या अपघातात आणखी दोन महिला गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा तरी जीव आता वाचावा अशीच प्रतिक्रिया प्रत्येकाच्या बोलण्यातून निघते आहे.

Dhule Ganesh Visarjan Accident
चितोड येथे गणेश मिरवणुकीचा ट्रॅक्टर गर्दीत शिरला: ३ बालकांचा मृत्यू, ६ जण जखमी

ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

आता या संदर्भात गावातील शैलेश अंबर मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ट्रॅक्टर क्रमांक एम एच 18 ए एन 14 11 वरील चालक आनंद सुरेश सोनवणे याच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहितेचे 2023 चे कलम 106 /1/ २८१,१२५/ अ/ ब, मोटर वाहन कायदा कलम 184, 134 ,177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भीषण अपघात झालेल्या घटनास्थळावर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे , उपविभागीय पोलीस अधिकारी संजय वाबळे, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.

Dhule Ganesh Visarjan Accident
ठाणे : गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान दोन गटांत हाणामारी तरीही पोलिसात तक्रार नाही

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news