डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील पिसवली ते गोळवली दरम्यान असलेल्या देशमुख होम्स परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. हा राडा गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झाल्याचे वृत्त आहे. मात्र 24 तास उलटूनही दोन्ही गटांकडून कुणीही तक्रार करण्यास पुढे आले नसल्याने कारवाई कुणावर करायची? या प्रश्नामुळे पोलिसांची पंचाईत झाली आहे.
कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या देशमुख होम्स परिसरात गुरूवारी रात्रीच्या सुमारास गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान दोन गटात चांगलाच राडा झाला. या राड्यामध्ये एका गटात त्याच परिसरातील व्यावसायिकाचे समर्थक होते. तर दुसरा गट राजकीय व्यक्तीच्या समर्थकांचा होता. जवळपास दीड ते दोन तास हा राडा सुरू होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
एकीकडे हाणामारीत जखमी झालेल्या दोघांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणी कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र गणेश विसर्जनाच्या दिवशी भर रस्त्यात झालेल्या राड्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तथापी या घटनेला 24 तास उलटूनही दोन्ही गटांकडील एकही तक्रारदार पुढे आला नाही. त्यामुळे गुन्हा दाखल कुणावर करायचा ? या प्रश्नावर पोलिसही बुचकळ्यात पडले आहेत. मात्र पोलिसांनी अशी भूमिका घेतल्यामुळे परिसरात कायदा, शांतता आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले.
गुरुवारी (दि.12) संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रायगडमधील मुरूड येथे गौरी गणपती विसर्जन मिरवणूकीवर आठ वर्षाच्या आतील दोन लहान मुलांनी दगडफेक केली. त्यामुळे दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आज शुक्रवारी (दि.13) सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान शहरातील एका गटातील नागरिकांनी मुरुड पोलिस ठाण्याला घेराव घालून दोन्ही मुलांना व त्यांच्या पालकांना अटक करण्याची मागणी केल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला होता.