

धुळे : धुळ्यातील खंडेराव बाजार या वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या एका हॉटेलला भीषण आग लागली आहे. या आगीचे कारण अस्पष्ट असून अग्निशमन दल वेळेत न आल्याने हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे.
शहरातील प्रभाकर चित्रमंदिर समोर असणाऱ्या पुरातन खंडेराव मंदिराच्या शेजारी रामभरोसे हॉटेल आहे. गेल्या चार दशकांपासून हे हॉटेल धुळे शहरामध्ये प्रसिद्ध आहे. या हॉटेलला आज सायंकाळी अचानक आग लागली. हॉटेलच्या मागील भागातून अचानक धूर बाहेर येऊ लागला. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचारी आणि अन्य व्यक्ती हे रस्त्यावर धावले. काही क्षणातच धुरामधून आगीचे लोट बाहेर पडू लागले.
दरम्यान ही माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. मात्र अग्निशमन दल येण्यापूर्वीच आगीने भीषण स्वरूप धारण केले होते. या आगीमध्ये हॉटेलमधील वस्तूंसह सौर पॅनल देखील जळून खाक झाले आहेत. प्रथमदर्शी ही आग स्वयंपाक घरातून किंवा शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येतो आहे. आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाली. तसेच या आगीचे चित्रीकरण आपल्या मोबाईल फोनमध्ये करणाऱ्यांची देखील स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे कोणताही अनर्थ होऊ नये, यासाठी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील हे पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या संदर्भात आता शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे.