Dhule FDA Action | धुळ्यात FDA ची धडक कारवाई; १ कोटी ५५ लाखांचे अन्नपदार्थ जप्त

सुरक्षित अन्न – सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत विशेष तपासणी मोहीमेत १७ अन्न परवाने निलंबित
  FDA Action
FDA Action
Published on: 
Updated on: 

Food Seizure Dhule

धुळे : दिवाळी सणाच्या कालावधीत मिठाई, फराळ, खाद्यतेल तसेच अन्य अन्नपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी धुळ्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने दि. १ सप्टेंबर २०२६ ते दि. ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विशेष तपासणी व कारवाई मोहीम राबविण्यात आली.यात १ कोटी ५५ लाख रुपयांहून अधिक किमतीचे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.तसेच सुरक्षित अन्न – सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत विशेष तपासणी मोहीमेत १७ अन्न परवाने निलंबित केल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे तसेच नाशिक विभागाचे सह आयुक्त (अन्न), मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सुरक्षित अन्न – सुरक्षित महाराष्ट्र’ या मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

या विशेष मोहिमेदरम्यान धुळे विभागात एकूण १३९ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून त्यांचे प्रयोगशाळा अहवाल प्रलंबित आहेत.

  FDA Action
Dhule Crime : एकाच रात्रीत तीन घरफोड्या; लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज लंपास

अन्नपदार्थांच्या तपासणीदरम्यान विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण २१ ठिकाणांहून ४०,५२५ किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत ९२ लाख २२ हजार ९४८ रूपये इतकी आहे. यामध्ये मिरची पावडर, हळद पावडर, खाद्यतेल, स्पेशल बर्फी, सोनपापडी व फरसाण यांसारख्या अन्नपदार्थांचा समावेश आहे.

तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत गुटखा, पानमसाला व तत्सम प्रतिबंधित पदार्थांची ६ ठिकाणांहून एकूण ३४,८१६ पाकिटे जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत ६३ लाख १८ हजार ६२१ रूपये इतकी आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईमध्ये २८ प्रकरणांत तडजोड शुल्कापोटी एकूण रु. १,लाख ७४,हजार ५०० रूपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच न्यायनिर्णयासाठी एकूण ८ प्रकरणांचे प्रस्ताव तयार करून ते नाशिक कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत.

अन्नपदार्थ उत्पादन करणाऱ्या ठिकाणी आवश्यक स्वच्छता व आरोग्यविषयक निकषांचे पालन न केल्याप्रकरणी १३ अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच असुरक्षित अन्नपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी ४ अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

दिवाळी फराळ विक्रेत्यांवर विशेष लक्ष

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चकली, लाडू, करंजी, चिवडा, शंकरपाळी आदी फराळाचे पदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या हंगामी विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार आवश्यक परवाना किंवा नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा व सदर परवाना दर्शनी भागात लावावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले होते. या आवाहनाला विक्रेत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

या विक्रेत्यांच्या उत्पादन व विक्री ठिकाणांची तपासणी करण्यात येत असून फराळ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कच्चे घटक पदार्थ तसेच तयार फराळाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. ही तपासणी मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.

  FDA Action
Dhule Crime | पिंपळनेरात सुमारे ३१ लाखांचा गुटखा जप्त : अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; तिघे ताब्यात!

ग्राहकांनीही घ्यावी काळजी

नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना अन्न सुरक्षा परवाना किंवा नोंदणीधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. अन्नपदार्थांची गुणवत्ता, पॅकिंग, उत्पादन दिनांक व वापरण्याची अंतिम मुदत तपासूनच खरेदी करावी. दूधापासून तयार केलेल्या मिठाईचा वापर संबंधित विक्रेत्याने दिलेल्या सूचनेनुसार साधारणतः २ ते ३ दिवसांच्या आत करावा. बंगाली मिठाई शक्यतो खरेदी केलेल्या दिवशीच वापरावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या मोहिमेतील सर्व तपासण्या व कारवाया आयुक्त तुकाराम मुंडे, सह आयुक्त (अन्न) मंगेश माने व सहायक आयुक्त (अन्न), गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद पवार, शशिकांत राणे, अरविंद राऊत व मंगेश भावसार यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.