Rajasthan Accident
धुळे : राजस्थान राज्यातील खाटू शामजी येथून दर्शन घेऊन परतत असणाऱ्या क्रुझर गाडीला कोटा- उदयपूर महामार्गावर शंभू पुरा गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात धुळे जिल्ह्यातील नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यातील मयत हे एकमेकांचे नातेवाईक असून एकाच परिवारातील चार जण आहेत. धुळे शहरातील सहा तर शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील तिघांचा मयतांमध्ये समावेश आहे. या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. दरम्यान मृतांना राजस्थान राज्यातीलच रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले असून गंभीर जखमी असणाऱ्या सात जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धुळे येथील साक्री रोड परिसरात राहणारे पवार कुटुंबीय मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यातील देव दर्शनासाठी तीन वेगवेगळ्या गाड्यांमध्ये निघाले होते. या परिवाराने १७ नोव्हेंबर पासून यात्रा सुरू केली होती. यात त्यांनी उज्जैन, ओंकारेश्वर, पुष्कर तसेच सालासार बालाजी यांचे दर्शन घेऊन खाटू श्यामजी यांचे दर्शन घेतले. तेथून ते काल धुळे येथे परत येण्यासाठी निघाले. दरम्यान या तीनही गाड्या जयपूर नजीक अल्पोपहारासाठी थांबल्या.
यानंतर एक क्रुझर गाडी आधी रवाना झाली. ही गाडी कोटा उदयपूर महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ पोहोचली. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या ट्रकवर ही क्रुझर जाऊन आदळली. या भीषण अपघातामध्ये गाडीचा चक्काचूर झाला. तसेच गाडी मधील नऊ जण ठार झाले. तर सात जण गंभीर जखमी झाले. दरम्यान या अपघाताची माहिती अपघात ग्रस्तगाडी मधील जखमी मुलीने अन्य गाडीमधील व्यक्तींना कळवली. त्यानुसार दोन्ही गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. मात्र तोपर्यंत मयत आणि जखमी यांना रुग्णालयात रवाना करण्यात आले होते.
मयतांमध्ये उषाबाई सज्जन पवार (60 वर्षे), रा. शांतिगीत नगर, सुरत बायपास, धुळे, सुशिलाबाई बाबूलाल पवार (65 वर्षे), रा. नवनाथ नगर, सुरत बायपास, धुळे, कैलास भगवान पवार (45 वर्षे), रा. अमराळे, ता. शिंदखेडा, सान्वी गणेश पवार (6 वर्षे), रा. शांतिगीत नगर, सुरत बायपास, धुळे, सज्जन दौलत पवार (70 वर्षे), रा. शांतिगीत नगर, सुरत बायपास,धुळे, अनिता कैलास पवार (40 वर्षे), रा. अमराळे, ता. शिंदखेडा, बाबूलाल दौलत पवार (73 वर्षे), रा. नवनाथ नगर, सुरत बायपास, धुळे, जानवी कैलास पवार (13 वर्षे), रा. अमराळे, ता. शिंदखेडा, आणि माधवी गणेश पवार (45 वर्षे), रा. शांतिगीत नगर, सुरत बायपास, धुळे, यांचा समावेश आहे.
मृत व्यक्तींमध्ये धुळे शहरातील शांतिगीत नगर येथील 4, नवनाथ नगर येथील 2 आणि शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील 3 व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.
जखमींमध्ये मनीषा शरद पवार (41 वर्षे), रा. नवनाथ नगर, धुळे. मयुरी शरद पवार (20 वर्षे), रा. नवनाथ नगर,धुळे.जगदीश कैलास पवार (10 वर्षे), रा. अमराळे, ता. शिंदखेडा, श्रीजीत गणेश पवार (4 वर्षे), रा. शांतिगीत नगर, धुळे , शरद बाबूलाल पवार (45 वर्षे), रा. नवनाथ नगर, धुळे, गणेश सज्जन पवार (32 वर्षे), रा. शांतिगीत नगर, सुरत बायपास, धुळे.
जखमी व्यक्तींमध्ये धुळे शहरातील नवनाथ नगर येथील 3, शांतिगीत नगर येथील 2 आणि शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. या सर्व जखमींना कोटा येथील स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे.