

दापोली : दापोली तालुक्यातील खेर्डी-कातळवाडी येथे मंडणगडहून दापोलीकडे जाणाऱ्या एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची भीषण घटना शनिवारी (दि. २१) सकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. सुरेंद्र शांताराम गोरीवले (वय ४५, रा. काळकाईकोंड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या अपघातात आणखी एका दुचाकीचेही नुकसान झाले असून संबंधित दुचाकीस्वाराला दुखापत झाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार नितीन कालेकर (वय २८, रा. करंजाणी, उगवतवाडी) हे जालगाव येथील श्रद्धा ऑटोमोबाईल पेट्रोल पंपावर रात्रपाळीचे काम संपवून दुचाकीने घरी जात होते. खेर्डी-कातळवाडी येथे आले असता त्यांच्या पुढे असलेल्या दुचाकीवरील सुरेंद्र गोरीवले यांना मागून येणाऱ्या एसटी बसने ओव्हरटेक केले. त्याचवेळी समोरून एसटी बस आल्याने दुचाकीच्या चालकाने ब्रेक लावला. त्यामुळे दुचाकी घसरून रस्त्यावर पडली. याचदरम्यान मंडणगड-दापोली एसटी बसची दुचाकीला धडक बसली. धडकेनंतर दुचाकी बसच्या खाली गेली आणि गोरीवले हे बसच्या खालच्या भागात अडकले. या अपघातात गोरीवले यांच्या डोक्याला, कमरेला तसेच हातापायांना गंभीर दुखापत झाली. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दुचाकीस्वार ओमकार कालेकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मंडणगड एसटी आगारातील बसचालक भारत नाथा भवार (वय ४७) यांनी बस वेगात व रस्त्याच्या मध्यभागातून धोकादायक पद्धतीने चालविल्याने अपघात घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराच्या मृत्यूसह दुसऱ्या दुचाकीचेही नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.