

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे शहरातील देवपूर भागात उच्चभ्रु सोसायटीत सुरू असलेल्या अवैध कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली. देवपूर पोलीस ठाण्यात दोन तरुण आणि कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे शहरात गेल्या महिन्यापासून लॉजमध्ये चालणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यातच देवपूर परिसरात काही उच्चभ्रू वसाहतींमध्ये अशा प्रकारचे कुंटण खाणे चालवले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी पोलीस पथकाला या माहितीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश केले.
देवपूर भागातील एका उच्चभ्रु सोसायटीत एक महिला चार महिन्यांपूर्वी भाडेतत्त्वावर घर घेऊन कुंटनखाना चालवित होती. छापा कारवाईवेळी गौरव लोटन महाजन, (रा. वरखेडी) व सौरभ राजेंद्र देवरे (रा. वरखेडी) असे दोन तरुण महिलांसोबत आढळून आले. कुंटणखान्यामधील तीन पीडित महिलांना रेस्क्यू करुन महिला सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. कुंटणखाना चालविणारी महिला, दोन तरुण गिऱ्हाईक अशांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी-धुळे शहर उपविभाग राजकुमार उपासे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्रीराम पवार, सपोनि. श्रीकृष्ण पारधी, अमित माळी, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, संदीप पाटील, धर्मेंद्र मोहिते, सुशिल शेंडे, शिला सुर्यवंशी, राजीव गिते, गुलाब पाटील, भरोसा सेल येथील पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील, प्रियंका उमाळे व मोनाली सैंदाणे यांनी केली.