

धुळे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) आजपासून सुरू झाल्या आहेत. परिक्षेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षातून 71 केंद्रांवरील 1 हजार 119 वर्गांचे ऑनलाईन लिंकद्वारे सनियंत्रण केले. त्यांच्या या उपक्रमाचे राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी अभिनंदन केल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार यांनी दिली.
शिक्षणाधिकारी पवार यांनी म्हटले की, धुळे जिल्ह्यात इयत्ता दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरु झाल्या असून पहिल्याच दिवशी एकूण 71 केंद्रांपैकी 70 केंद्रांवर 1 हजार 119 ब्लॉक मध्ये ऑनलाईन लिंकद्वारे सनियंत्रण केले आहे. या परीक्षेसाठी 28 हजार 392 विद्यार्थी प्रविष्ठ आहे. पहिला पेपर मराठी विषयाचा शांततेत पार पडला. बारावीच्या परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेसाठी जिल्हा यंत्रणेमार्फत झूम लिंकद्वारे परीक्षेचे नियंत्रण करण्यात आले. पूर्ण जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे योजना राबविल्यामुळे परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रशासनाला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले. तसेच ही यंत्रणा राबवण्यासाठी खर्च सुद्धा नाही, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सांगितले.
परीक्षेसाठी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, विभागीय अध्यक्ष, नाशिक डॉ. सुभाष बोरसे हे सुद्धा झुम लिंकद्वारे उपस्थित होते. शिक्षण आयुक्तांनी धुळे जिल्ह्याच्या या अभिनव प्रयोगाचे तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनीष पवार तसेच जिल्हा प्रशासनाच्या सर्व टिमचे अभिनंदन केले. सर्व परीक्षा केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त असल्याने बाहेरील उपद्रव रोखण्यात पोलिस प्रशासनास मोठे यश मिळाले आहे.
परीक्षा केंद्रावर कॉपीचे गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, पालकमंत्री यांनी दिले आहेत. तसेच परीक्षेत कॉपी करण्यास सहाय्यभूत ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याचा सूचना देखील दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या नियोजनामुळे कॉपीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यास प्रशासनाला यश प्राप्त झाले आहे. परीक्षा केंद्रावरील सर्व परीक्षा दालनात पर्यवेक्षकांचे मोबाईल झूम मीटिंगद्वारे जिल्हा परिषदेत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येऊन नियंत्रण कक्षाद्वारे संपूर्ण 71 केंद्रांचे नियंत्रण करण्यात येत आहे. तसेच उपद्रवी केंद्रांवर ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात येऊन गर्दीवर नियंत्रण करण्यात येत असून परीक्षा केंद्रावर बाहेरील गर्दीचे नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस यंत्रणेचे देखील सहकार्य मिळत आहे. असे शिक्षणाधिकारी पवार यांनी कळविले आहे.