

धुळे : स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्या डॉक्टरसह दोघा महिला कर्मचाऱ्यांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
विशेष म्हणजे भ्रूण हत्या करण्याचे हे रॅकेट सुरत येथे गर्भलिंग तपासणी केल्यानंतर राबवले जात असल्याचा प्राथमिक तपासात उघड झाले आहे. गर्भलिंग तपासणी केल्यानंतर अशा पद्धतीने मुलींच्या गर्भाची हत्या केली जात असल्याची बाब पथकाने धुळ्यात उघडकीस आणली.
धुळे येथील साक्री रोडवर असणाऱ्या सुमन हॉस्पिटल या ठिकाणी मुलींच्या गर्भाची हत्या केली जात असल्याची ऑनलाइन तक्रार झाली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पीसीपीएनडीटी पथकाला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश केले. त्यानुसार या पथकातील आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी अचानक सुमन हॉस्पिटल वर छापा टाकण्याचे निश्चित केले. त्यासाठी एक बनावट महिलेला तपासणीसाठी पाठवण्यात आले.
यानंतर छापा सत्र राबवत असताना एका खोलीमध्ये एका महिलेचा गर्भपात घडवून आणल्याची बाब निदर्शनास आली. या खोलीत दोन ते अडीच महिन्याचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. त्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला. पथकाने सविस्तर कारवाई केल्यानंतर रात्री उशिरा धुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर सोनल वानखेडे तसेच महिला कर्मचारी रोहिणी दीपक शिरसाठ व शोभा नरेंद्र सरदार यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 88, 91, 92 सह मुंबई नर्सिंग होम ॲक्ट 1949 चे कलम 11, ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन्ही महिला आरोपींना मंगळवार (दि.1) आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावर आढळून आलेल्या घटनाक्रम न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानुसार न्यायालयाने तिघाही महिला आरोपींना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश केले आहेत.