

धुळे, पुढारी वृत्तसेवाः
शासन स्तरावरून मुलींच्या जन्माचे स्वागत आणि बेकायदेशीरपणे मुलींना गर्भातच खुडून मारणाऱ्यांवर कठोर शासन करणे सुरू आहे. मात्र असे असताना धुळ्यात साक्री रोडवर एका रुग्णालयात गर्भपात करून नकोशीला जन्मच नाकारला जात असल्याचा खळबळ जनक प्रकार आज पीसीपीएनडीटी पथक आणि जिल्हाधिकारी यांच्या पथकाने उघडकीस आणला आहे. या संदर्भात आता रुग्णालयाच्या चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
धुळ्यातील साक्री रोडवर सुमन हॉस्पिटलमध्ये गर्भपात केंद्र चालवले जात असल्याची ऑनलाईन तक्रार प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी पीसीपीएनडीटी पथकाला या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देशित दिले होते. त्यानुसार आज या पथकातील आरोग्याधिकारी डॉ. संपदा कुलकर्णी, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्त वर्षा महाजन, धुळे शहर नायब तहसीलदार अविनाश सोनकांबळे, पोलीस अधिकारी वसंत गोंधळी, पोलीस कर्मचारी मोनाली पगारे आणि पथकासोबत कायदेशीर सल्लागार अॅड. मिरा माळी या देखील सहभागी होत्या.
पथकाने सुमन हॉस्पिटल येथे छापा टाकून तपासणी सुरू केली. या रुग्णालयात एक महिला तपासणीसाठी आल्याचे आढळून आले. तिची चौकशी केली असता ती गर्भपात करण्यासाठी आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पथकाला या ठिकाणी अवैधपणे गर्भपात केंद्र चालवला जात असल्याचे खात्री पटली. याच वेळी एका खोलीतून विव्हळण्याचा आवाज ऐकू आल्याने पथकाने थेट त्या खोलीत पाहणी केली असता एक महिला गंभीर अवस्थेत आढळून आली. याच खोलीत सुमारे साडेतीन महिन्यांचा गर्भ आढळून आला .हे मुलींचे अर्भक असल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय पथकाच्या निदर्शनास आली. त्यामुळे संबंधित महिलेला तातडीने रुग्णालयात रवाना करण्यात आले. या संदर्भात पथकातील आरोग्य अधिकारी डॉक्टर कुलकर्णी यांनी माहिती दिली.पथकाने छापा टाकला असता सुमन हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ. सोनल वानखेडे या जागेवर आढळून आल्या नाहीत. जे कर्मचारी आढळून आले ते प्रशिक्षित नव्हते. गर्भपाताच्या गोळ्या आढळून आल्या. या गोळ्या कोणी आणि कुठून आणल्या याची माहिती कोणालाही सांगता आली नाही. कर्मचारी वर्गाला विचारणा केली असता उलटसुलट उत्तरे त्यांच्याकडून मिळाली. आम्हाला काहीच माहिती नाही, सर्व मॅडम बघतात अशी उत्तरे देण्यात आली. कोणत्याच प्रकारची कागदपत्रे आढळून आली नाही. रजिस्टर प्रमाणित केलेले नव्हते. रजिस्टरमधील काही पाने फाडलेली दिसून आली. यापूर्वी किती गर्भपात झाले असेल याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. परिणामी या हॉस्पिटलचे सोनोग्राफी मशीन सील करण्यात आले आहे, अशी माहिती मनपाच्या अधिकारी डॉ. संपदा कुलकर्णी यांनी यावेळी दिली. सुरत येथे जाऊन तपासणी केल्यानंतर मुलीचा गर्भ असल्याची माहिती घेतल्यानंतर धुळ्यातील सुमन हॉस्पिटल येथे येऊन गर्भपात होत असल्याचेही तपासणी आणि चौकशीतून समोर आल्याचे सांगण्यात आले.