

धुळे : शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम जामण्यापाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर गांजाची बेकायदेशीर लागवड आढळून आली. दुर्गम भागामुळे तेथील मुद्देमाल जप्त करून वाहतुकीने आणणे शक्य नसल्याने, न्यायालयाचा आदेश घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गांजा शेती जागेवरच नष्ट करण्यात आली आहे.
वनविभागाच्या हद्दीतील 122 गुंठे (1,22,000 चौरस फूट) क्षेत्रात आढळलेल्या अंदाजे 2,125 किलो गांजाच्या झाडांची नासधूस करून तब्बल 1 कोटी 6 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
संशयित व्यक्तींनी वनविभागाच्या जमिनीवर प्रतिबंधित कॅनाबिस वनस्पतीची लागवड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुसार परिसर अतिदुर्गम असल्याने लागवड केलेला गांजा जप्त करणे शक्य नव्हते. त्यामुळे एनडीपीएस कायद्यातील कलम 52 अन्वये मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून जागेवरच शेती नष्ट करण्यास परवानगी मिळवण्यात आली.
1 कोटी 6 लाख 25 हजार रुपये किमतीचा गांजा
परवानगीनुसार पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने वनविभाग व स्थानिक पोलीस पथकाने छापा टाकला असता, जामण्यापाडा परिसरात वनक्षेत्रातील कंपार्टमेंट नंबर 1020 मधील सुमारे 40 हजार चौरस फूट क्षेत्रात 42 लाख 45 हजार रुपये किमतीचा गांजा आढळला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गांजाची सर्व झाडे नष्ट करण्यात आली आहे.
तसेच कंपार्टमेंट क्रमांक 1041 मधील 37 गुंठे आणि 1042 मधील 45 गुंठे, एकूण 82 गुंठे क्षेत्रातील गांजा संशयितांनी कारवाईच्या भीतीने आधीच कापून टाकला होता. या गांजाचे अंदाजे वजन 1,276 किलो असून, त्याची किंमत 63 लाख 80 हजार रुपये आहे. हा मालही पथकाने जाळून नष्ट केला.
एकूण 122 गुंठे क्षेत्रातील 2,125 किलो गांजा नष्ट झाला असून त्याची एकत्रित किंमत 1 कोटी 6 लाख 25 हजार रुपये एवढी आहे. त्यापैकी 849 किलो माल कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आल्याने, या प्रकरणी पोलीस सागर ठाकूर यांनी संशयित व्यक्तींविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एनडीपीएस कायद्यातील कलम 8(क), 20(b)II(क) व 22(क) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुनिल वसावे करत आहेत.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे आणि त्यांच्या पथकासह वनविभागातील अधिकाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई पार पाडली.