

डोंबिवली : भुवनेश्वर एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला तिकीट तपासणीसाने तिकीट विचारले. या प्रवाशाजवळ तिकीट नव्हते. तपासणीसाने प्रवाशाला ताब्यात घेऊन अंबरनाथ रेल्वे स्थानक आल्यानंतर कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात दिले. जवानांना संशय आल्याने त्यांनी झडती घेतली असता या प्रवाशाजवळ तीन किलो गांजा आढळून आला. एक्सप्रेसमध्ये विनातिकीट प्रवास करत हा प्रवासी धाडसाने एक्सप्रेसमधून अंमली पदार्थ घेऊन प्रवास करत होता. या तरूणाचे धाडस पाहून रेल्वे सुरक्षा बलासह पोलिसही चक्रावून गेले आहेत.
भावेश गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी उच्चभ्रू कुटुंबातील उच्चशिक्षित असून वाईट संगतीमुळे तो गांजा तस्करीत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी भावेश विरोधात गुन्हा नोंदवून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे लोहमार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.
अंबरनाथहून कल्याण रेल्वे स्थानकात त्याला गांजाच्या साठ्यासह उतरविण्यात आले. लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणल्यानंतर सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी चौकशी केली असता हा तरूण उच्चशिक्षित कुटुंबातील उच्चशिक्षित असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रवासी रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील मोहपाडा गावचा रहिवासी असल्याचे तपासात समोर आले. रेल्वे तिकीट तपासणीसाच्या तत्परतेमुळे हा प्रवासी रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
अटक आरोपी भावेश गायकवाड याने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने कॅफे सुरू केला होता. मात्र वाईट संगतीमुळे भावेश नशेच्या आहारी गेला. त्यानंतर त्याचा कॅफे बंद पडला. त्याने सोन्याचे दागिने गहाण ठेवले. नशेच्या आहारी जाऊन सर्व काही गमावल्याने त्याला पैशांची गरज भासली. त्यामुळे भावेश गांजा तस्करीकडे वळाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. एकीकडे त्याने गांजाचा साठा कुठून आणला ? हा गांजा तो कुणाला विक्री करणार होता ? या दिशेने पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. खिशात पैसे नसताना रायगड ते भुवनेश्वर एक्सप्रेस हा प्रवास त्याने कसा केला ? याचीही माहिती पोलिस काढत आहेत. तर दुसरीकडे या प्रवाशाच्या चौकशीतून गांजा तस्करांची टोळी उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.