

धुळे : धुळे शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरात बनावट देशी विदेशी दारू तयार करण्याचा छोटा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने उध्वस्त केला आहे. घटनास्थळावरून दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन आणि स्पिरिट जप्त करण्यात आले आहे. तर एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यात आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी बनावट दारू व अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी देखील पथके नियुक्त केली. त्यातच आज पोलीस निरीक्षक पवार यांना शासकीय दूध डेअरी परिसरामध्ये बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी पोउनि अमित माळी, पोलीस अंमलदार मच्छिद्र पाटील, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, हेकॉ. शिला सुर्यवंशी व हर्षल चौधरी या पथकाला घेऊन छापा मारला.
पथकाने सहजीवन नगरातील गणेश नारायण निकम यांच्या ताब्यात असलेल्या घरावर छापा टाकला असता या ठिकाणी बनावट दारू तयार होत असल्याची बाब उघडकीस आली. घटनास्थळावरून पोलिसांनी बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरिट, बाटल्यांना बुच लावण्यासाठी वापरात येणारे मशीन, खाली बाटल्या, बूच, स्टिकर तसेच अन्य साहित्य असा एकुण 1,लाख 68,हजार 90 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
असून निकम याच्या विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी देखील या आरोपीच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. तर सहजीवन नगरातून तयार झालेली बनावट दारू नेमकी कोणत्या तस्कराला पुरवठा केला जात होता. याबाबत देखील आता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे.