धुळे
महामार्गावर साधूचा वेष धारण करून प्रवाशांना फसवून लूट करणाऱ्या उत्तराखंडातील टोळीला मोहाडी पोलिसांनी गजाआड केले आहे.Pudhari News Network

Dhule Crime : महामार्गावर रस्ता लूट करणारे तोतया साधू मोहाडी पोलीसांच्या ताब्यात

लळींग घाट परिसरात दरोड्याचा उलगडा
Published on

धुळे : महामार्गावर साधूचा वेष धारण करून प्रवाशांना फसवून लूट करणाऱ्या उत्तराखंडातील टोळीला मोहाडी पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या नेतृत्वाखालील या कारवाईत लळींग घाट परिसरात घडलेल्या दरोड्याचा उलगडा झाला. प्राथमिक तपासात या टोळीने राज्यातील अनेक ठिकाणी अशा पद्धतीने प्रवाशांना लुटल्याची माहिती समोर आली आहे.

पाणी द्या आणि आशीर्वाद घ्या...

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील खासणे गावातील ललीता नरेंद्र पाटील या कुटुंबासह देवदर्शन करून धुळे मार्गे परतत होत्या. धुळे शहरालगतच्या लळींग घाटात साधूच्या वेशातील एका व्यक्तीने त्यांची गाडी अडवली. पाणी द्या आणि आशीर्वाद घ्या असे सांगत त्याने प्रवाशांना गाडीतून उतरवले. प्रवाशांनी त्याच्या पाया पडताच त्याने दोन महिलांना खालीच थांबण्यास सांगितले आणि अचानक चाकूचा धाक दाखवत दागिने काढून घेतले. त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेनंतर ललीता पाटील यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली.

तोतया साधू उत्तराखंड येथून आले

मुंबई-आग्रा महामार्गावर गस्त घालताना पोलिसांना गरताडबारी येथे साधूच्या वेशात एक संशयित पायी जाताना दिसला. चौकशीत तो उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी कसून विचारपूस केली असता तो उत्तराखंडातील हरिद्वार जिल्ह्यातील घेसुपुरा सफेरा वस्ती येथील जागीरनाथ बाबुनाथ नाथसफेरे येथील असल्याचे उघड झाले.

त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावर लूट करणाऱ्या टोळीत गोविंदनाथ कल्लूनाथ नाथसफेरे, सौदागर बाबुनाथ नाथसफेरे, विक्की मोसमनाथ नाथसफेरे आणि क्रांता मोसमनाथ नाथसफेरे यांचा सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी सर्वांना अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कारही जप्त करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन पाटील, पंकज चव्हाण, मुकेश मोरे, प्रकाश जाधव, रमेश शिंदे व मनिष सोनगिरे यांनी ही कारवाई यशस्वी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news