

नाशिक रोड : धुळे येथे सापडलेल्या रोकडप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. तसेच पोलिसांकडून तपास सुरू असून, मिळालेली रक्कम ट्रेझरीमध्ये जमा करण्यात आली आहे. संबंधित कर्मचारी व साक्षीदारांचे जबाब घेतले जात आहेत. त्यामुळे सत्य लवकरच बाहेर येईल असे स्पष्ट मत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात कुंभमेळा आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, धुळे येथे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रक्कम आढळल्याच्या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री फडवणीस यांनी घेतली आहे. याबाबत एसआयटीची स्थापना केल्याने सत्य समोर आल्यानंतरच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. प्रयागराज येथे नुकत्याच पार पडलेल्या कुंभमेळ्यात काही दुर्दैवी घटनांमुळे चेंगराचेंगरीसारखे प्रकार घडल्याचा दाखला देत डॉ. गोऱ्हे यांनी नाशिकमध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. महिला, बालक, अपंग व्यक्ती यांच्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून, विशेषतः महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृह, कपडे बदलण्यासाठी सुरक्षित खोल्या तसेच महिला आखाड्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, 'नरकातला स्वर्ग' या खा. संजय राऊत यांच्या पुस्तकाबाबत विचारले असता, मला हे पुस्तक वाचायला वेळ मिळालेला नाही, असे सांगत गोऱ्हे यांनी राऊत यांच्याबाबतच्या प्रश्नाला बगल दिली.
पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर भाष्य करताना डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, महिला आयोगाने आणि पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केला असता, तर ही घटना टाळता आली असती. महिला तक्रार करत असल्यास पोलिस आणि आयोग दोघांनीही गंभीर दखल घेणे अत्यावश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.