

Dhule Police Interstate Gang Busted
धुळे : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना वाहनात बसवून त्यांच्याकडील रोकड लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा धुळे स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या पथकाने या टोळीतील तीन संशयित आरोपींना गुजरात आणि नंदुरबार येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली सुमारे पाच लाख रुपये किमतीची कार आणि ४० हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर फाट्यावरील महाजन हॉटेलजवळ बोराडी येथील प्रशांत शांताराम पाटील यांना इको कारमधून आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वाहनात बसवले. प्रवासादरम्यान त्यांच्या खिशातून लबाडीच्या इराद्याने एक लाख रुपये काढून घेतल्यानंतर त्यांना रस्त्यातच खाली उतरवून आरोपी पसार झाले.
या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात BNS कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तांत्रिक विश्लेषण तसेच अन्य पुराव्यांच्या आधारे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी आरोपींची ओळख पटवली. टोळीतील मुख्य आरोपी सुरत येथे असल्याची, तर अन्य दोन आरोपी इको कारसह आणखी एक गुन्हा करण्यासाठी नंदुरबार येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
आरोपींच्या अटकेसाठी LCBने दोन स्वतंत्र पथके तयार करून एक पथक सुरत, तर दुसरे नंदुरबार येथे रवाना केले.
पोलिसांनी मोहसीन ऊर्फ नववा हुसैन शेख (रा. सुरत, गुजरात) याला सुरत येथून ताब्यात घेतले. तर शोएब अब्दुल मजीद अकबानी (रा. संजर नगर, सुरत, गुजरात) आणि अशरफ खान रुस्तम खान (रा. वैस्तान आवास, सुरत, गुजरात) यांना नंदुरबार येथून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आरोपींनी शिरपूर येथील गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि लुटलेली रोकड पोलिसांच्या ताब्यात दिल्याने ती जप्त करण्यात आली.
आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील वाडी वऱ्हे येथेही लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका प्रवाशाला वाहनात बसवून जबरी चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्राथमिक तपासात या तिन्ही आरोपींच्या विरोधात धुळे, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. या टोळीने आणखी किती गुन्हे केले आहेत, याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.