

Annasaheb Patil Mahamandal Coordinator Arrested
धुळे : वैयक्तिक कर्ज योजनेतून घेतलेले कर्ज फेडल्यानंतर व्याज परतावा मिळण्यासाठी मुंबई येथील कार्यालयास प्रस्ताव पाठवण्याच्या मोबदल्यात ५ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा समन्वयक शुभम भिका देव याला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत.
यातील तक्रारदार यांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडुन "वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत" रोजगाराकामी जेसीबीसाठी कर्ज मिळण्याकरीता पात्रता प्रमाणपत्र घेऊन इंडसइंड बँकेकडून २४, लाख ९६ हजार रुपये वैयक्तिक कर्ज घेवून जेसीबी खरेदी केले होते.
या कर्जाच्या अठरा हप्त्यांची मुदतीत परतफेड करुन व्याज परतावा योजनेअंतर्गत त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केलेल्या व्याजाची रक्कम परत मिळण्याकरीता त्यांनी महामंडळाच्या धुळे येथील कार्यालयात जाऊन जिल्हा समन्वयक शुभम भिका देव यांची भेट घेतली. यावेळी देव यांनी आवश्यक कागदपत्रे तक्रारदार यांच्याकडून जमा करुन घेऊन तकारदार यांचा व्याज परताव्याचा प्रस्ताव महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम दिल्याशिवाय त्यांचा प्रस्ताव पाठविणार नाही, असे तक्रारदार यांना सांगितल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तकार दिली होती.
या तक्रारीची पडताळणी केली असता जिल्हा समन्वयक शुभम भिका देव यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. देव यांच्या सांगण्यानुसार जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावर पैसे देण्याचे ठरले. या ठिकाणी सापळा लावला असता लाच घेताना देव यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
त्यामुळे करुन सदर लाचेची रक्कम त्यांनी धुळे शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात येऊन त्यांच्या विरुध्द धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.