

धुळे : शहरातील स्वच्छता आणि साफसफाईची कामे पारंपरिकरीत्या स्वच्छतेत मोलाचे योगदान देणाऱ्या वाल्मिकी व मेहतर समाजाच्या नोंदणीकृत संस्थांना प्राधान्याने देण्यात यावीत, अशी स्पष्ट सूचना महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात या संदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष सारवान होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार, हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे, नगरपालिका प्रशासन अधिकारी अभिजित बाविस्कर तसेच नागेश कंडारे, विजय पवार, सुभाष जावडेकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
सारवान म्हणाले की, जिल्ह्यातील महापालिका, नगरपरिषद व नगर पंचायतींमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात. हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचे सर्वेक्षण करून त्यांच्या पुनर्वसनासाठी कार्यवाही व्हावी. तसेच, राज्य परिवहन विभागात सफाई कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी काम केल्यास योग्य मोबदला दिला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
स्वच्छता कामांमध्ये मेहतर समाजाच्या नोंदणीकृत संस्थांना प्राधान्य देणे, समाजाच्या लोकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणे, तसेच कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, यावर त्यांनी विशेष भर दिला.
या बैठकीत ‘हाताने मैला उचलण्यास प्रतिबंध व पुनर्वसन अधिनियम 2013’ ची प्रभावी अंमलबजावणी, सफाई कर्मचाऱ्यांचे सुरक्षित कार्यपरिसर, वैद्यकीय सुविधा, विमा संरक्षण, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि कायम नियुक्ती या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.