

Viral Audio Clip Controversy
धुळे : भाजप नेते विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात त्यांचा राजीनामा घेऊन कारवाई करण्यात आली. मात्र, त्याच संभाषणात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या राज्यातील मंत्र्यांबाबत भारतीय जनता पक्षाची भूमिका संशयास्पद असल्याची टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.
पत्रकाद्वारे गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि जयकुमार रावळ यांच्यावर निशाणा साधला. विजय चौधरी यांनी माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, त्यांच्या कुटुंबीयांसह माजी खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह भाषा वापरली. मात्र, त्या संभाषणाला कथितपणे प्रोत्साहन देणाऱ्या मंत्र्यांवर भाजप काय कारवाई करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
माजी खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्याबाबत कथित संभाषणात वापरण्यात आलेल्या भाषेवरही गोटे यांनी आक्षेप घेत, आदिवासी समाजातील ज्येष्ठ महिला नेत्या असलेल्या गावित यांचा योग्य सन्मान राखला गेला नसल्याचा आरोप केला. तसेच अशा प्रकारच्या वक्तव्यांना पाठबळ देणाऱ्यांवरही पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
याच पत्रकात गोटे यांनी जयकुमार रावळ यांच्याविरोधातील विविध आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचे जुने आरोप पुन्हा उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. विजय चौधरी यांच्यावर कारवाई झाली, मात्र संबंधित मंत्र्यांबाबत मौन का बाळगले जात आहे, असा प्रश्न उपस्थित करत भाजपच्या भूमिकेवर त्यांनी निशाणा साधला. तसेच पक्षातील काही नेत्यांवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री संबंधितांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.