धुळे : अनिल गोटे यांच्या आंदोलनाच्या दणक्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग

धुळे : अनिल गोटे यांच्या आंदोलनाच्या दणक्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग
Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा – धुळे शहरातील देवपूर आणि रेल्वे स्टेशन परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामात अडचणी निर्माण करणाऱ्या कृषी विद्यापिठ, धुळे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात शुकवार (दि.१४) रोजी लोकसंग्राम पक्षाचे संस्थापक तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी देहत्याग आंदोलन सुरू करताच बांधकाम विभाग खडबडून जागे झाले आहे. या विभागाने आठ दिवसात या रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे. जनतेच्या सुविधाच्या आड येणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी कामचुकारपणा केल्यास त्यांना सोडणार नसल्याचा इशारा माजी आमदार गोटे यांनी दिला आहे.

धुळे शहरात रहदारीची मोठी समस्या आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील रस्त्याच्या कामात दिरंगाई केली. विशेषता धुळे महानगरपालिकेच्या प्रशासनाने देखील या रस्त्याच्या कामात अडथळेच निर्माण केल्याचा आरोप गेल्या आठवड्यात माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. यावेळी त्यांनी देहत्याह आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शुकवार (दि.१४) रोजी शिवतीर्थ नजीकच्या कल्याण भावना पासून सार्वजनिक बांधकाम विभागापर्यंत मोर्चा काढत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार यांच्या दालना बाहेर पोर्चमध्ये माजी आमदार अनिल गोटे यांनी त्यांच्या समर्थकांसह ठिय्या मारत आंदोलन सुरू केले.

आंदोलनाप्रसंगी लोकसंग्राम पक्षाचे तेजस गोटे, जिल्हाध्यक्ष प्रशांत भदाणे, विजय वाघ, माजी उपनगराध्यक्ष दिलीप साळुंखे, सलीम शेख, अकबर शेख ,प्रकाश महानोर, वामनराव मोहिते, सुरेश जैन, मनीष थोरात यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. कार्यकर्त्यांनी सुमारे तासभर प्रचंड घोषणाबाजी करीत या तीनही प्रशासनाचा निषेध केला. यानंतर माजी आमदार अनिल गोटे ,अधीक्षक अभियंता अनिल पवार तसेच अभियंता आर आर पाटील यांची आंदोलन ठिकाणीच बैठक झाली. या बैठकीत गोटे यांनी या कामास दिरंगाई होण्याचे कारणच काय ,असा प्रश्न उपस्थित केला.

हा नवीन रस्ता धुळे शहरातील रहदारीची समस्या सोडवणारा रस्ता आहे. मात्र प्रशासन निधी मंजूर असून देखील अडवणुकीचे धोरण ठेवणार असेल तर आपण आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडू. विशेषता कृषी महाविद्यालयातील अधिकारी हे साक्री तालुक्यातील रहिवासी असून ते माजी खासदार सुभाष भामरे यांच्या इशाऱ्याने रस्त्याची अडवणूक करीत असल्याचा खळबळ जनक आरोप देखील यावेळी गोटे यांनी केला. जिल्ह्याला उपलब्ध झालेला निधी जुलै अखेर परत गेल्यास आपण कामाची अडवणूक करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी अधीक्षक अभियंता पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत हे काम आपण तातडीने मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. आठ दिवसात या ठिकाणी कच्चा रस्ता केला जाईल, त्यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री वापरली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार गोटे यांनी हे आंदोलन तुर्त आठ दिवसांसाठी स्थगित केले आहे. विशेष म्हणजे आता पुन्हा रस्त्याच्या कामात अडवणूक करण्यात आल्याचे निदर्शनास आले तर पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news