धुळे : कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर तरूणीवर अत्याचार केल्याच्या घटनेचे धुळ्यात देखील तीव्र पडसाद उमटले आहेत. धुळे येथील इंडियन मेडिकल असोसिएशन वतीने रविवारी (दि.१८) मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात असंख्य डॉक्टरांनी सहभाग घेत या प्रकरणाचा सीबीआयच्या माध्यमातून तपास करण्याची मागणी केली.
कोलकात्यातील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी (दि.९) रोजी विद्यार्थीनीवर झालेल्या अमानुष अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण देशात उमटले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी धुळे येथील इंडियन मेडिकल असोसिएशनसह डॉक्टरांच्या अन्य संघटनेच्या वतीने आयएमए सभागृह येथून आज (रविवारी) मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला डॉक्टरवरील अत्याचार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देऊन जलद गतीने तपास व्हावा, सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, डॉक्टरांसाठी केंद्रीय सुरक्षा कायदा त्वरीत मंजुर करावा, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.