

धुळे : शिरपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी गाव स्तरावरील विविध घटकांचे योगदान लाभत असून अभियानाची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी कार्यवाही देखील सुरू करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस कामगिरी नुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरीता उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन 2025- 26 या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा स्तरांवर प्रोत्साहन देण्याकरिता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात दिनांक 17 सप्टेंबर पासून झाली. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून पणन व राजशिष्ठाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिझ शेख यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्य़ातील शिरपूर तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतीराज अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीत हे अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत सहभागी यंत्रणेची विविध स्तरावर बैठक कार्यशाळा घेऊन कामाचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व ग्रामपंचायतींना संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची नोंद केली जात आहे. विविध माध्यमातून अभियानाची गाव स्तरावर जनजागृती केली जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी बोलताना गट विकास अधिकारी प्रदीप पवार म्हणाले, शासनाच्या विविध योजनांमध्ये शिरपूर तालुक्याने नेत्रदीपक कामगिरी केली आहे . मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही शिरपूर तालुक्यासाठी संधी असून गावातील सर्व घटकांच्या लोकसहभागातून या अभियानात राज्यस्तरावर नेत्रदीपक कामगिरी करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांनी केले आहे.
पवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत येणाऱ्या विविध घटकांवर सूक्ष्म अभ्यास करून नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक विभागाला त्या संदर्भात जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गाव स्तरावरील विविध घटकांच्या सहभागातून हे अभियान परिणामकारकरित्या राबविण्यात येत असून त्यासाठी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, स्थानिक लोक प्रतिनिधी, सर्व ग्रामस्थ, शासकीय यंत्रणेतील घटक यांनी अभियानात सक्रीय योगदान द्यावे, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.