धुळे, पुढारी वृत्तसेवा : लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा राज्यातील प्रत्येक बहिणीचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो तिला कायम मिळणारच, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तर महिलांना लाभ मिळत असताना विरोधक सातत्याने केवळ टीका करीत आहेत. मात्र, महिलांनी या कपटी सावत्र भावापासून सावध राहिले पाहिजे. अडीच वर्ष तुमच्या हातात सत्ता असताना तुम्ही दिले नाही. आम्ही देत असताना तुमच्या पोटात का दुखते आहे. योजनांच्या माध्यमातून जनतेला लाभ होत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. (Eknath Shinde)
साक्री तालुक्यातील भाडणे येथे मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास राज्याचे मंत्री दादा भुसे, मंत्री विजयकुमार गावित, आमदार आमशा पाडवी, आमदार जयकुमार रावळ, आमदार किशोर दराडे, माजी खासदार सुभाष भामरे, आमदार अमरीशभाई पटेल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरतीताई देवरे, माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्क नेते चंद्रकांत रघुवंशी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित तसेच सतीश महाले यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार मंजुळाताई गावित यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी बोलत असताना माझी बहीण आमदार सौ मंजुळाताई गावीत यांचा आज शिवसेनेत प्रवेश झाला असून त्यांचे आपण स्वागत करत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाची सुरुवातच मुख्यमंत्री शिंदे यांनी अहिराणी भाषेतून केली. (Eknath Shinde)
यावेळी त्यांनी आदिवासी स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करत असताना त्यांना अभिवादन केले. ते पुढे म्हणाले की, मला सख्खी एक बहीण आहे. पण आता मला कोणी विचारले तर मी राज्यातील करोडो बहिणी या माझ्याच बहिणी असल्याचे सांगतो. याबाबत आम्ही नशीबवान भाऊ आहोत. सर्व बहिणींचे प्रेम आम्हाला मिळते आहे. लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळवण्यासाठी न्यायालयात देखील त्यांनी काहींना पाठवले. मात्र, न्यायालयाने स्थगिती न देता त्यांचा अर्ज फेटाळला. (Eknath Shinde)
रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधी म्हणजेच 17 ऑगस्टरोजी अर्ज पात्र झालेल्या महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे म्हणजे तीन हजार रुपये वर्ग होतील. तर 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरणाऱ्या महिलांच्या खात्यात देखील तीन महिन्यांचे म्हणजेच 4500 जमा होतील, असे त्यांनी सांगितले.
तर साक्री तालुक्यात गेल्या 25 वर्षांपासून बंद असलेला पांझरा कान साखर कारखाना लवकरच सुरू होईल, यासाठी सरकार आवश्यक ती मदत करेल, त्याचप्रमाणे दीनदयाल सूत गिरणी संदर्भात देखील मदत करण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जितेंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आभार मानले.