धुळे : धुळे ते पुणे व पुणे ते धुळे पूर्ववत रेल्वे सेवा सुरू करावी अशी आग्रही मागणी धुळे लोकसभा क्षेत्राच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ही रेल्वे सेवा सुरू करण्याचे आश्वासन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे. दरम्यान ही रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाल्यास धुळे ते पुणे व पुणे ते धुळे प्रवास करणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांसह प्रवासी यांच्या वेळेची व आर्थिक बचत होणार आहे.
धुळे जिल्ह्यातील बहुसंख्या विद्यार्थी, नागरिक, व्यापारी व नोकरदार वर्ग वेगवेगळ्या कामानिमित्ताने धुळे ते पुणे व पुणे ते धुळे प्रवास करीत असतात. धुळे जिल्ह्यातून संबंधित ठिकाणी प्रवास करणाऱ्यांची नियमित संख्या भरपूर आहे. खाजगी एसटी सेवा, लक्झरी सेवा यातून सर्वसामान्य नागरिकांना वेळ व आर्थिक भूदंड बसत असतो. परिणामी स्थानिकांची मागणी लक्षात घेता कोरोना काळापूर्वी धुळे ते पुणे व पुणे ते धुळे रेल्वे सेवा कार्यान्वित होती. मात्र कोरोना नंतरच्या काळात तांत्रिक कारणाने सदरची रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.ती अद्यापही बंद असल्याने संबंधितांची प्रचंड गैरसोय होते. हे लक्षात घेता धुळे लोकसभा क्षेत्राच्या काँग्रेस खासदार तथा माजी मंत्री डॉ. शोभा दिनेश बच्छाव यांनी रेल्वे मंत्र्यांचे या मागणीकडे लक्ष वेधले आहे.
धुळे रेल्वे स्थानक येथे सुसज्ज सुस्थितीतील प्लॅटफॉर्म तसेच इलेक्ट्रिक व्यवस्था, स्टेबल लाईन उपलब्ध असल्याने धुळे ते पुणे व पुणे ते धुळे रात्र प्रवासाची रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी खासदार शोभा बच्छाव यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पूर्ववत रेल्वे सेवा सुरू झाल्यास स्थानिक संबंधितांचा वेळ व आर्थिक बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे. या धुळे ते पुणे धुळे रेल्वे सेवा लवकरच सुरू करू, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांना दिले आहे.