

परळी वैजनाथ : धनगर आरक्षणाचे आंदोलन करते दीपक बोराडे यांना सकाळी अटक झाल्यानंतर याचे सर्वत्र पडसाद उमटत असून परळीतही या अटकेचा निषेध व्यक्त करत धनगर समाज आक्रमक झाला.
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी आंदोलन करणारे अंबड येथील धनगर समाज नेते दीपक बोराडे हे 21 जानेवारी रोजी मुंबई येथे धनगर समाज बांधवांसह धडकणार असल्याचा इशारा देऊन ठिकठिकाणी संवाद मिळावे घेत आहेत. मात्र आज सकाळी अंबड पोलिसांनी सुरुवातीला त्यांना नजर कैदेत ठेवले. त्यानंतर त्यांना अटक केली.
या अटकेनंतर सर्वत्र निषेध व्यक्त करत याचे पडसाद उमटत आहेत. याच अनुषंगाने परळीतही धनगर समाज आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. शहर पोलीस ठाण्यासमोर धनगर समाज बांधवांनी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांना निषेधाचे निवेदन सादर केले.
"आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं"," सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है", दीपक बोराडे यांची अटकेतून सुटका करा अशा प्रकारच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी शहर पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने धनगर समाज युवक, बांधव उपस्थित होते. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांना याबाबतचे निवेदन त्यांनी सादर केले.