

धुळे : राज्याच्या गुप्तवार्ता विभागाने धुळे आणि मालेगाव येथे जिवाला धोका असल्यामुळे गर्दीत जाण्याचे टाळण्याचा सल्ला दिला. मात्र, माझ्या हातावर माझ्या बहिणींनी बांधलेल्या राख्या असून, त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला कोणत्याही धोक्याची भीती नाही. मला कोणताही धोका स्पर्शदेखील करू शकत नाही. बहिणी, मायमाउल्या, शेतकरी आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करताना जीव गेला, तरी मी माझे भाग्य समजेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
धुळे येथील जेल रोडवर सोमवारी (दि. १२) जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आयोजित महिला मेळाव्यात ते बाेलत होते. यावेळी खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार अमोल मिटकरी यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इरशाद जहागीरदार, कैलास चौधरी, महेंद्र शिरसाठ, रवींद्र आघाव, संजय जगताप, नरेंद्र अहिरे, रोहन पोळ, नरेंद्र चौधरी, प्रमोद साळुंखे, जया साळुंखे, सारांश भावसार आदींची उपस्थिती होती.
पवार म्हणाले, महायुती सरकारच्या माध्यमातून आज शेतकरी, महिला, युवक आणि युवतींसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवत आहोत. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार केला. त्यामुळे महायुतीला मोठे नुकसान झाले. मात्र, संविधान कोणीही बदलू शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराला बळी पडणे जनतेने टाळले पाहिजे. जनतेची सेवा करणे हाच आमच्या पक्षाचा धर्म आहे. राज्यातील महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना आर्थिक सहकार्य करावे, हे गेल्या अनेक वर्षांपासून डोक्यात होते .त्यामुळेच आपण कल्याणकारी योजना आणल्या. लाडकी बहीण योजना आणत असताना मध्यमवर्गीय महिला बरोबर गोरगरीब महिलांचा आम्ही विचार केल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकार एका लिटरमागे पाच रुपयांचे अनुदान देणार आहे, असे सांगतानाच राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीदेखील त्यांनी दिली.
विजेच्या प्रश्नावरून शेतकरी अडचणीत येत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे वीजबिलदेखील सरकार भरणार आहे. यापुढे वीजजोडणी तोडण्यासाठी कोणीही येणार नाही. शेतकऱ्यांनी विजेचे बिल भरू नये, वीजतोडणी करण्यास कोणी आल्यास त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव सांगा, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.