जळगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार जनसन्मान यात्रेनिमित्त सोमवारी (दि. 12) अमळनेर दौऱ्यावर असताना त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला का? याबाबत विचारणा केली तसेच फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या.
यावेळी एकीने अर्ज रिजेक्ट झाल्याची तक्रार केल्याने पवार यांनी त्या महिलेचा अर्ज भरून घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. दरम्यान, पवार यांनी थेट बांधावर जाऊन महिलांची भेट घेतल्याने चांगलीच चर्चा रंगली. उपमुख्यमंत्री पवार यांनी शेतात काम करणाऱ्या महिलेशी संवाद साधत यावेळी त्यांनी महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याचे तसेच त्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
अमळनेर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांसमवेत भाेजन करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सफाई कर्मचाऱ्यांमुळेच आपण स्वच्छ वातावरण असल्याचे सांगत सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.