धुळे, पुढारी वृत्तसेवा – धुळे शहरात गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या नंदुरबारच्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून हा अनधिकृत औषधाचा साठा जप्त करण्यात आला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे शहरात गुंगीकारक औषधाच्या बाटल्या आणि गोळ्यांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर त्यांनी धुळ्याच्या बस स्थानक परिसराजवळ सापळा लावण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अमित माळी व प्रकाश पाटील तसेच संजय पाटील, हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, प्रल्हाद वाघ, संदीप पाटील, रवींद्र माळी, सुरेश भालेराव, प्रकाश सोनार, कैलास महाजन यांना पाठवले. यावेळी बस स्थानकजवळील टॅक्सी स्टॅंड परिसरात एक व्यक्ती संशयितपणे हालचाली करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अजय राजू कोठारी असून तो नंदुरबार येथील रहिवासी असल्याचे सांगितले. त्याच्याजवळ असलेल्या वस्तूंची झडती घेतली असता त्यात एका खाकी रंगाच्या बॉक्समध्ये गुंगीकारक औषधाच्या बाटल्या तसेच गोळ्यांचा साठा असा 24 हजार 975 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: