धुळ्यात डॉक्टरविरोधात डॉक्टर, बच्छाव यांच्या उमेदवारीमुळे पक्षांतर्गत असंतोष?

धुळ्यात डॉक्टरविरोधात डॉक्टर, बच्छाव यांच्या उमेदवारीमुळे पक्षांतर्गत असंतोष?

धुळे : 2009च्या मतदारसंघ पुनर्रचनेपासून विजयाची हुलकावणी मिळालेल्या धुळे मतदार संघातील काँग्रेस पक्षाची विकलांगता सर्वश्रुत आहे. आता बलाढ्य महायुतीशी दोन हात करताना पक्षनेतृत्वाने जाहीर केलेल्या उमेदवारीवरून पडलेली वादाची ठिणगी सार्वत्रिक चर्चेचा विषय झालेली आहे. पक्षाने माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांचे नाव घोषित करताच त्याचे तीव्र पडसाद उमटून इच्छुकांच्या रांगेत असलेल्या नाशिक आणि धुळे जिल्हाध्यक्षांनी राजीनामास्त्र उपसले आहे. यावर पक्षनेतृत्व नेमकी काय भूमिका घेते, याकडे मतदार संघाचे लक्ष लागून राहणार आहे. तथापि, डॉ. बच्छाव यांची उमेदवारी कायम राहिली, तर इथे डॉक्टर विरुद्ध डॉक्टर अशी प्रमुख लढत होणे अपेक्षित आहे.

महायुतीकडून भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांचे नाव तिसर्‍यांदा जाहीर झाले. डॉ. भामरे यांना तोडीस तोड उमेदवार देण्याचा निश्चिय काँग्रेसने जाहीर केला असला, तरी त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी नेमके कोण मैदानात उतरणार, याविषयी औत्सुक्य होते. पक्षाने माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर केली आणि पक्षातील वाद उफाळून आला. पक्षातील इच्छुक तथा नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे आणि दुसरे इच्छुक धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी थेट बंडाचे निशाण फडकावले. आपापल्या पदांचा राजीनामा देत दोघांनी मतदार संघाबाहेरच्या आणि अडगळीत पडलेल्या व्यक्तीला उमेदवारी बहाल केल्याबद्दल नेतृत्वाला दूषणे दिली. वस्तुत:, बच्छाव आणि शेवाळे परिवारांत घनिष्ठ संबंध असूनही डॉ. तुषार यांनी आक्रमक भूमिका घेऊन उमेदवार बदलण्याची मागणी केली.

धुळे मतदार संघातील सहापैकी केवळ एका विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा आमदार आहे. या मतदार संघात पारंपरिक मुस्लिम मतदार पक्षापासून दुरावला आहे. सुमारे सव्वादोन ते अडीच लाख मुस्लिम मतदारांना आकृष्ट करण्यासाठी वंचितने अब्दुल रेहमान यांना तिकीट जाहीर केले आहे, तर एमआयएम उमेदवाराची घोषणा अद्याप बाकी आहे. अशा परिस्थितीत सुस्थितीतील महायुतीशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसमध्ये एकीची अपेक्षा असताना डॉ. शोभा बच्छाव यांच्या नावाची घोषणा होताच पक्षांतर्गत असंतोष उफाळला. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात डॅमेज कंट्रोलसाठी धुळे भेटीवर जाणार असल्याची चर्चा आहे. ते दोन्ही जिल्हाध्यक्षांची कशी समजूत काढतात आणि महाविकास आघाडीची मोट बांधण्याची कशी किमया साधतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

पक्षनिष्ठा, नातीगोती ही बलस्थाने

डॉ. शोभा बच्छाव गेल्या 35 वर्षांहून अधिक काळापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत. नाशिकच्या पहिल्या महिला महापौर आणि आमदार म्हणून त्यांची कामगिरी दखलपात्र राहिली आहे. शिवाय, 2004 मध्ये विलासराव देशमुख मंत्रिमंडळात त्यांची आरोग्य राज्यमंत्रिपदी वर्णी लागली होती. त्यावेळी त्यांच्याकडे धुळे जिल्हा पालकमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मराठा चेहरा, पक्षनिष्ठा, मालेगाव तालुक्यातील सासर आणि बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर असलेले नातेसंबंध या मुद्द्यांवर डॉ. बच्छाव यांना पक्षाने धुळ्यात उमेदवारी दिल्याचे बोलले जाते. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या शिफारशीवरूनच डॉ. बच्छाव यांच्या नावावर हायकमांडने शिक्कामोर्तब केल्याची माहितीही पुढे आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news