

धुळे; पुढारी वृत्तसेवा : 21 वर्षीय तरुणीची चाकूने गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना धुळ्याच्या नकाने रोड परिसरात बुधवारी रात्री समोर आली. गुरुवारी सकाळी पोलिसांची दोन पथके खुन्याचा माग काढत असताना तरुणीच्या घराच्या काही अंतरावरच काटेरी झुडपांमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला. त्याने विष घेऊन जीवन संपवल्याचे दिसत असून, त्याच्या अंगावर रक्ताचे डाग असल्याने त्यानेच खून करून नंतर संपवले असल्याचा संशय पोलिस सूत्रांनी व्यक्त केला आहे.
निकिता कल्याण पाटील (रा.विघ्नहर्ता हॉस्पिटलमागे, बालाजीनगर, धुळे) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. राहत्या घरातच तिची गळा चिरून हत्या करण्यात आली. रात्री ती घरी एकटी असल्याचे पाहून हल्लेखोराने थेट घरात घुसून गळा चिरून तिची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वानपथकासह घटनास्थळी धाव घेतली होती. गुरुवारी सकाळी दोन पथके तयार करून खुन्याचा शोध घेण्यात येत असताना निकिताच्या घराच्या काही अंतरावरच तरुणाचा मृतदेह आढळला. या तरुणाचे नाव अनिकेत बोरसे असून, हा तरुण निकिता पाटीलशी संबंधित होता, अशी माहिती पोलिसांना मिळत आहे. त्यानेच निकिताचा खून केला असावा, असा अंदाज पोलिसांना आहे. मात्र, तूर्त निष्कर्षाप्रत पोलिस आलेले नाहीत. निकिता पाटील आणि अनिकेत बोरसे यांच्यात प्रेम संबंध होते.