

धुळे : धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या अंतर्गत अंमली पदार्थ तस्करी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थाचा साठा मंगळवारी (दि.३) न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीत गाडून नष्ट करण्यात आला . यात सुमारे दोन टन गांजा, तीन टन भांग तर १२५ किलो अफू नष्ट करण्यात आली आहे.
धुळे जिल्हा पोलीस दलाने गेल्या वर्षभरामध्ये अमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी कारवाया केल्या. यात सर्वात जास्त कारवाई शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आल्या. तर वाहनांमधून मुंबईकडे तस्करीच्या कारवाईमधून देखील मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. हा अंमली पदार्थाचा साठा नष्ट करण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस दलाने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने अटी आणि नियमांचे पालन करून हा साठा नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज (मंगळवारी) पोलीस मुख्यालयालगत असणाऱ्या मोकळ्या जागेमध्ये जेसीबीच्या मदतीने मोठा खड्डा खोदण्यात आला. यानंतर प्रक्रिया करून या खड्ड्यांमध्ये हा साठा गाडण्यात आला. यावेळी सुमारे २२०० किलो गांजा, तर ३१०० किलो भांग तसेच १२५ अफु गाडून नष्ट करण्यात आली. ही सर्व कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली करण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षिका स्वाती काकडे हे उपस्थित होते.