

धुळे : शिरपूर तालुक्यातील कनगई शिवारातील वनजमिनीवर खड्डा खोदून लपवून ठेवलेला सुमारे 50 लाख 50 हजार रुपयांचा सुका गांजा शिरपूर पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना अमली पदार्थ तस्करीबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या परवानगीने व उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला. सुनील वसावे, सागर ठाकूर, चत्तरसिंग खसावद, राजू ढिसले, कृष्णा पावरा आणि मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कनगई शिवारातील नाल्यालगत जनावरांच्या कडब्याखाली लपवलेले 505 किलो गांजाचे प्लास्टिकच्या गोण्यांतील साठे आढळून आले. गांजाची अंदाजे किंमत 50 लाख रुपये आहे. हे ठिकाण मुख्य रस्त्यापासून सुमारे 2 किमी अंतरावर असल्याने पोलिसांची चाहूल लागताच आरोपी सुरेश सुबाराम पावरा जंगलात पळून गेला. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुनील वसावे करीत आहेत.