पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील रोजगाव येथील शेतीची खातेफोड करून तीन भावंडांच्या नावाने सातबारा करुन देण्यासाठी एप्रिल आणि मे महिन्यात लाच मागितल्याप्रकरणी महिला तलाठी व तामथरे येथील मंडलाधिकारी ज्योती पवार यांना लाचलुचपत विभागाने चिमठाणेजवळ पकडले.
याप्रकरणी त्यांच्यासह संगणक ऑपरेटर आणि कोतवाल यांच्याविरोधातही गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराकडून खातेफोड करुन तीन भावाच्या नावाने सातबारा करण्यासाठी तत्कालीन तलाठी ज्योती के. पवार (३५) यांनी ४० हजाराची लाच मागितली होती. त्यापैकी मार्च २०२३ मध्ये तक्रारदाराकडून १० हजार आणि त्यांच्या वडिलांकडून १० हजार असे एकूण २० हजार काम करुन देण्याचे मोबदल्यात अगोदरच घेतले. त्यानंतर १८ एप्रिल २०२३ रोजी तक्रारदाराने या प्रकरणी नंदुरबार लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
तलाठी ज्योती पवार यांनी तडजोडीअंती १५ हजार लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार त्याच दिवशी तलाठी यांना लाचेची रक्कम देण्यासाठी गेला असता त्या मिळून आल्या नाहीत. नंतर संगणक ऑपरेटर योगेश कैलास सावडे (२५) आणि कोतवाल छोटू भिकारी जाधव (४५) या दोघांनी तक्रारदाराकडे उर्वरित रक्कमेची मागणी केली. पण जेव्हा तक्रारदाराने त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र दोघांना काहीतरी वेगळे होत आहे, असा संशय आल्याने पैसे न घेता तेथून निघून गेले. शेवटी लाचेची मागणी केली म्हणून वरील दोघांना नंदुरबार येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. तिघांविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तत्कालीन महिला तलाठी यांना आज पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे सांगितले. मात्र संगणक ऑपरेटर आणि कोतवाल या दोघांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा :